

Shivaji Kon Hota Book Controversy: बुलढाण्यात सध्या शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित या पुस्तकाच्या वाचन कार्यक्रमावरून आता संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून, शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.
या वादाची ठिणगी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याच्या आरोपांनंतर अधिक पेटली. त्यानंतर या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज बुलढाण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व रोहित पवार करणार असून, प्रकाशक प्रशांत आंबी देखील यात सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे, आंदोलनकर्त्यांकडून आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाचं जाहीर वाचन करण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना कठोर शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
गायकवाड म्हणाले की, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आधीच काही कार्यक्रमांना परवानगी नाकारली होती आणि त्यांनी त्या निर्णयाचा आदर करत स्वतःचाही कार्यक्रम रद्द केला. मात्र, अशा परिस्थितीतही संबंधित पुस्तकाचं जाहीर वाचन करण्यामागे काही जणांचा हेतू महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावण्याचा असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, ते स्वतः या पुस्तक वाचन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. “आम्ही तिथे शांतपणे बसून पुस्तकाचं वाचन ऐकू. जर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख झाला, तर आम्ही त्याचं स्वागत करू. पण जर महाराजांचा एकेरी उल्लेख करून भावना भडकवण्याचा प्रयत्न झाला, तर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्यास त्याची जबाबदारी आयोजकांवर असेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण केल्याच्या चर्चांनाही गायकवाड यांनी फेटाळून लावलं. “मी अशी कोणतीही लेखी किंवा सार्वजनिक मागणी केलेली नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
याचबरोबर आंदोलनासाठी उभारण्यात आलेला मंडप हटवण्यात आल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “कोणावरही दबाव टाकलेला नाही. स्थानिक परिस्थिती पाहून मंडप वाल्याने स्वतः निर्णय घेतला असावा,” असं ते म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणामुळे बुलढाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून, आज होणाऱ्या मोर्चा आणि पुस्तक वाचन कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पोलिस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.