Who Is Salim Dola: दाऊदचा खास माणूस भारतात; जग हादरवणारा सलीम डोला कोण आहे? मुंबई पोलीस करणार चौकशी

Who Is Salim Dola: दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोलाला तुर्कस्तानातून भारतात आणण्यात भारतीय यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे.
Who Is Salim Dola
Who Is Salim DolaPudhari
Published on
Updated on

Salim Dola Dawood Ibrahim Aide Deported India: सलीम डोला हे नाव अनेक वर्षांपासून भारतातील अंडरवर्ल्ड, आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी आणि दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीशी जोडलं होतं. आता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मोठी कारवाई करत सलीम डोलाला भारतात आणण्यात यश मिळवलं आहे.

तुर्कस्तानातील इस्तंबूलमध्ये अटक झाल्यानंतर त्याला विशेष विमानाने भारतात आणण्यात आलं. मंगळवारी पहाटे तो दिल्ली विमानतळावर दाखल झाला असून सध्या गुप्तचर यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू आहे. लवकरच त्याला पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाण्याची शक्यता आहे.

कोण आहे सलीम डोला?

सलीम डोला हा दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीतील अत्यंत विश्वासू सदस्य आहे. अंडरवर्ल्डमध्ये तो विशेषतः ड्रग्स नेटवर्क चालवणारा मोठा सूत्रधार म्हणून ओळखला जात होता. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, तो परदेशातून डी-कंपनीच्या अमली पदार्थांचं रॅकेट संभाळत होता.

माहितीनुसार, सलीम डोलाचं नेटवर्क वर्षाला तब्बल 5 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या ड्रग्स व्यवहारांशी संबंधित होतं. भारतासह अनेक देशांमध्ये त्याच्या टोळीचं जाळं पसरलं असल्याची माहिती तपास यंत्रणांकडे आहे. ड्रग्स उत्पादन, तस्करी, आर्थिक गैरव्यवहार आणि काळा पैसा पांढरा करण्यासारख्या गंभीर आरोपांमध्ये त्याचं नाव समोर आलं आहे.

तुर्कस्तानातून भारतात कसं आणलं?

भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय एजन्सींनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली. इस्तंबूलमध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर विशेष विमानाने त्याला भारतात आणण्यात आलं. ही कारवाई भारतीय तपास यंत्रणांसाठी मोठं यश मानली जात आहे.

दिल्लीत पोहोचताच त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. तपास यंत्रणांना त्याच्याकडून डी-कंपनीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

Who Is Salim Dola
Dawood Ibrahim Gang : दाऊद टोळीतील अमली पदार्थ तस्कर सलीम डोला याला इस्तंबूलमध्ये अटक

मुलगा आणि साथीदारांवर आधीच कारवाई

सलीम डोलाविरोधातील कारवाई मागील काही महिन्यांपासून सुरू होती. जून 2025 मध्ये त्याचा मुलगा ताहेर डोलाला संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचा जवळचा साथीदार सलीम मोहम्मद सोहेल शेख यालाही दुबईमधून भारतात डिपोर्ट करण्यात आलं होतं. या दोघांवर मुंबई अँटी-नार्कोटिक्स सेलने कारवाई केली होती.

ईडीचाही तपास सुरू

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate - ED) देखील सलीम डोला आणि त्याच्या नेटवर्कशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणांची चौकशी करत आहे. ड्रग्स तस्करीतून मिळालेला पैसा परदेशात कसा फिरवला जात होता, याचा तपास सुरू आहे.

Who Is Salim Dola
Paytm Impact: Paytm पेमेंट्स बँक बंद झाल्यानंतर तुमच्या EMI, SIP आणि OTT पेमेंटचं काय होणार? जाणून घ्या सर्व माहिती

भारतासाठी मोठं यश

सलीम डोलाची भारतात झालेली हकालपट्टी ही भारतीय तपास आणि गुप्तचर यंत्रणांसाठी मोठं यश मानलं जात आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडिकेट आणि डी-कंपनीच्या आर्थिक जाळ्यावर मोठा आघात झाल्याचं मानलं जात आहे. आता चौकशीतून डी-कंपनीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचे अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news