

Buldhana crime hotel murder suicide news
बुलढाणा : तंत्रनिकेतनची विद्यार्थीनी असलेल्या प्रेयसीला भेटायला बोलावून चाकूने निर्घृणपणे भोसकून एका माथेफिरू प्रियकराने तीची हत्या केली. यानंतर त्याने चाकूने भोसकून स्वत:लाही संपवल्याची खळबळजनक घटना खामगांव शहरात सजनपूरी भागातील हॉटेल जुगनूमध्ये घडली.
मंगळवारी (दि.२३) रात्री ८.३० वाजता ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले. या घटनेत मृत झालेले हे प्रेमीयुगुल साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) येथील रहिवासी आहेत. कु.ऋतूजा पद्माकर खरात (२१) व साहिल राजपूत (२३) अशी मृतांची नावे आहेत.
दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे बोलले जाते. ऋतूजा ही खामगांवच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे. काल मंगळवारी (दि.२३) खामगावला आलेल्या साहिल राजपूत याने ऋतूजाला हॉटेलवर भेटायला बोलावले. तेथे त्यांच्यात काहीतरी बिनसले असावे. शिघ्रकोपी साहिलने प्रेयसी ऋतूजावर चाकूने सपासप करून तीची हत्या केली. त्याचवेळी स्वतःच्या छातीवर चाकूने वार करुन स्वत:लाही संपवले. या थरारक घटनेत दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.
या भीषण घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसा़चे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी हॉटेलभोवती बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अफवांचे ही पेव फुटले होते. त्यामुळे लोकांना हटवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. जिल्हा पोलिस अधिक्षक निलेश तांबे, एसडीपीओ प्रदिप पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करुन तपासाचे निर्देश दिलेत. कथित प्रेमप्रकरणात दोघांचा असा अंत झाल्याच्या घटनेने खळबळ व हळहळ व्यक्त होत आहे.