

बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारातील अफूच्या शेतीवर आज शनिवार २२ फेब्रुवारी रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली. सुमारे १२ कोटी ६० लाख रूपये किंमतीची प्रतिबंधित अफू जप्त करण्यात आली. शेतमालक संतोष मधुकर सानप (वय ४९, रा. अंढेरा) याला गुन्हा दाखल करून अटक केली आहे. १२ गुंठे क्षेत्रातून जप्त केलेल्या या अफू पिकाचे वजन १५ क्विंटल ७२ किलो एवढे आहे. प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या साठ्यावर बुलढाणा एलसीबीने केलेली अलिकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई आहे.
अफू पिकाची लागवड आढळलेले शेत हे अंढेरा पोलीस स्टेशनपासून अवघ्या ४ किमी. अंतरावर आहे. मात्र अंढेरा पोलीस याबाबत अनभिज्ञ कसे? याविषयी पोलीस वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. बुलढाणा एलसीबीला या अफूच्या शेतीविषयी गुप्त मिळाल्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, एपीआय आशिष रोही यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने अफू शेतीवर धाड घालून कारवाई केली.