

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: बुलढाणा वन परिक्षेत्रातील गुम्मी मंडलामध्ये दोन बिबट्यांची विषप्रयोग करून हत्या केल्याप्रकरणी वनविभागाच्या तपास पथकाने एका संशयिताला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची वनकोठडी दिली आहे.
सुनिल रामदास दांडगे (३५,रा.गुम्मी ता.बुलढाणा) याची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती.त्या घटनेच्या रागातून बिबट्याला अद्दल घडविण्यासाठी त्याने मृत शेळीच्या शरिरावर विष टाकले होते. शेळीचे विषबाधित मांस खाल्ल्याने दोन बिबट्यांचा मृत्यू झाला. बुधवार ९एप्रिल रोजी गुम्मी वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेतील दोन बिबट्यांचे मृतदेह आढळून आल्यानंतर वनविभागात खळबळ उडाली. १०ते १५दिवसांपूर्वी हे बिबटे मृत झाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
मृत बिबट्यांच्या जवळच शेळीच्या अवयवांचे काही अवशेष दिसून आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला. यामुळे वनविभागाच्या पथकाने शेळीपालन करणा-या सुनिल दांडगे याला संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची वनकोठडी दिली आहे. मृत बिबट्यांचे काही अवशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. वन्यजीव क्राईम सेल मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांचीही तपासात मदत घेतली जात आहे.अशी माहिती उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी दिली.