

Cash seized in Malkapur
बुलढाणा : मलकापूर शहरात बुलढाणा मार्गावर बोदवड नाक्यावरील वानखेडे पेट्रोलपंपाजवळ एका संशयित कारमधून पोलिसांनी १कोटी ९७ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली आहे. दोनच दिवसांपूर्वी धुळे शहरात कोट्यावधी रूपयांचे घबाड जप्त झाल्यापाठोपाठ मलकापूरातही मोठे संशयास्पद घबाड हाती लागल्याने खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर शहर पोलिसांचे पथक शुक्रवारच्या दुपारी बोदवड नाक्याजवळील वानखडे पेट्रोल पंपाजवळ वाहनांची तपासणी करीत असतांना एका सिल्वर कलरच्या कारमधील दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यावरुन त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी या कार क्र. एमएच २० जी व्ही १७८१ची कसून तपासणी केली असता कारमधील सीटखाली मोठ्या प्रमाणात रोकड दिसून आली.
या बाबत कारमधील दोन्ही व्यक्तींनी समर्पक उत्तरे न दिल्याने ही संशयित कार मलकापूर शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आली. तेथे महसूल विभागाचे अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, दोन सरकारी पंच , स्टेट बँकेचे दोन अधिकारी यांच्या समक्ष संशयित रोकड ही मशिनद्वारे मोजण्यात आली. ही रोकड १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपयांची असल्याचे समोर आले. पंचनामा केल्यानंतर याबाबत आयकर विभागाला अवगत करून जप्त केलेली पुर्ण रोकड बुलढाणा जिल्हा कोषागारात जमा करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे जाहीर केली नसून ते छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी आहेत. मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक गणेश गिरी यांनी ही माहिती दिली.