

Nakadongri Forest Range Leopard Cub Found Dead
भंडारा: नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र चिचोली (दक्षिण) नियत क्षेत्र पवणारा अंतर्गत येणाऱ्या राखीव वन कक्ष क्रमांक ३६४, ऋषीदेव पहाडी साखळी परिसरात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक महिलांच्या सतर्कतेमुळे ही घटना वनविभागाच्या निदर्शनास आली.
साखळी येथील काही महिला जंगलात जळाऊ सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांना तीव्र दुर्गंधी जाणवली. दुर्गंधीच्या दिशेने जाऊन पाहणी केली असता त्यांना बिबट्याचा बछडा मृतावस्थेत दिसून आला. महिलांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने नजीकच्या वनधिकाºयांना याची माहिती दिली. माहिती मिळताच शुक्रवारी, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राथमिक पाहणी करून पंचनामा केला व वरिष्ठांना सूचित केले. मात्र, सायंकाळ झाल्यामुळे पुढील कार्यवाही थांबवून शनिवारी, सकाळी ८ वाजता पुन्हा घटनास्थळी मोहीम राबवण्यात आली.
शनिवारी, सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव रक्षकांचे प्रतिनिधी व पंचांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. बिबट्याचा बछडा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकले नाही. पशुवैद्यकीय अधिकाºयांनी तपासणीसाठी आवश्यक ते अवयव व अवशेष सीलबंद करून प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने 'एनटीसीए'च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घटनास्थळीच दहन करून अवशेषांचा नियमानुसार निपटारा करण्यात आला. हा बछडा सुमारे महिन्याभरापूर्वी मृत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक रितेश भोंगाडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम थोरात, डॉ. आशिष गटकल, एनजीओ प्रतिनिधी शाहिद खान व अझर पाशा, वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. राहांगडाले (तुमसर), सचिन रामटेके (नाकाडोंगरी), क्षेत्र सहाय्यक टी. एच. घुले, बीटरक्षक आर. टी. झंझाड, ओ. एन. मोरे, वनरक्षक दीपक उईके, बायोलॉजिस्ट शुभम मोदनकर व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. बिबट्याच्या बछड्याचे मृत्यूचे निश्चित कारण प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असून वनविभाग पुढील तपास करत आहे.