

भंडारा : बार्टी, सारथी व आरटीच्या शासकीय स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या प्रवेशपूर्व ऑनलाइन परीक्षेदरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. भंडारा येथील बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयातील परीक्षा केंद्रावर सुमारे १२५ परीक्षार्थी उपस्थित होते. बायोमेट्रिक प्रक्रिया सुरू असतानाच वीज गेल्याने काही परीक्षार्थींचे लॉगिन झाले, तर अनेकांना लॉगिन करता आले नाही. त्यानंतर ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्यानंतर काही प्रश्न सोडविल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने परीक्षार्थींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत ही परीक्षा नियोजित होती. परीक्षा सुरू करण्यापूर्वी परीक्षार्थींची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करण्यात येत होती. मात्र, याचदरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सुमारे निम्म्या परीक्षार्थींचे बायोमेट्रिक पूर्ण झाले, तर उर्वरित परीक्षार्थींना लॉगिन करता आले नाही. दरम्यान, ज्यांचे लॉगिन झाले, त्यांनी ऑनलाइन प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात केली.
काही परीक्षार्थींनी पाच ते सहा प्रश्न सोडविल्यानंतर सायंकाळी सुमारे ५.५० वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर तब्बल ६.०५ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाला. परीक्षा केंद्रावर वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर केंद्रचालकांनी परीक्षा पुढे सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, परीक्षार्थींनी त्यास तीव्र विरोध केला.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परीक्षा प्रक्रियेत मोठा व्यत्यय आला असून, अनेक परीक्षार्थींना निर्धारित वेळेत परीक्षा देता आली नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करून नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केली. विशेषतः दूरवरून आलेल्या परीक्षार्थींमध्ये मोठी नाराजी होती. यामध्ये युवतींचीही संख्या होती. परीक्षा लांबल्याने त्यांना परतीच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला होता.
केंद्रचालकांनी परीक्षा नंतर घेण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी परीक्षार्थींनी लावून धरली. मात्र, यावर तातडीने तोडगा न निघाल्याने परीक्षा केंद्र परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सायंकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा केंद्राबाहेर मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
शासकीय स्पर्धा परीक्षांच्या आयोजनात वारंवार तांत्रिक अथवा अन्य कारणांमुळे अडथळे निर्माण होत असल्याने परीक्षार्थींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वीही याच परीक्षा केंद्रावर एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील नियोजन, तांत्रिक व्यवस्था आणि पर्यायी विद्युत व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
उशिरापर्यंत परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार, याबाबत परीक्षार्थींना स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने त्यांची अस्वस्थता कायम होती. दूरवरून आलेल्या परीक्षार्थींनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.