Bhandara: कलेवाडा येथे दारुच्या पैशाच्या वादातून तरुणाचा खून | पुढारी

Bhandara: कलेवाडा येथे दारुच्या पैशाच्या वादातून तरुणाचा खून

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कलेवाडा येथे युवकावर विटेने हल्ला करुन खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवून आरोपी ऊसतोड कामगाराला नागपूरच्या रेल्वेस्थानकावरुन अटक केली. दारुच्या पैशातून झालेल्या वादात धर्मेंद्रचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

धर्मेंद्र शंकर भोवते (वय ४८, रा. कलेवाडा) हा पेंटींगचे काम करीत होता. या गावात मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यातील जामुनटोला येथील सुरेश महुसिंग कुंजाम (वय २७) हा ऊसतोड कामगार म्हणून आला होता. या दोघांची ओळख झाल्याने दोघेही सोबत दारु प्यायचे. दरम्यान, त्यांच्यात दारुच्या पैशावरुन वाद सुरू झाला. रविवारी अड्याळ येथील आठवडी बाजारातून हे दोघेही कलेवाडा येथे घरी परतले. तिथे त्यांनी दारु प्यायली. त्यातच दोघांमध्ये पुन्हा दारुच्या पैशावरुन वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या सुरेश कुंजाम याने विटेने धर्मेंद्रच्या डोक्यावर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. चौकशीदरम्यान सुरेश कुंजाम हा गावात नसल्याचे समोर आल्याने त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सुरेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो नागपूरच्या दिशेने पळून जात असल्याचे माहित होताच पोलिसांचे पथक पाठविण्यात आले. अवघ्या आठ तासांत त्याला नागपूरच्या रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेण्यात आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेचा अधिक तपास अड्याळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, धनंजय पाटील, रोशन गजभिये, प्रशांत कुरंजेकर, अजय बारापात्रे, नंदकिशोर मारबते, सुभाष रहांगडाले, शैलेश बेदुरकर, जगदिश श्रावणकर, कौशिक गजभिये, जितेंद्र वैद्य, गंगाधर कांबळे यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button