भंडारा: निलज येथे पूर्ववैमनस्यातून विषप्रयोग करुन तरुणाचा खून | पुढारी

भंडारा: निलज येथे पूर्ववैमनस्यातून विषप्रयोग करुन तरुणाचा खून

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेऊन मादक द्रव्यामध्ये विष दिल्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान त्याला विष दिल्याचे निष्पन्न झाल्याने पवनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. ही घटना पवनी तालुक्यातील निलज येथे ३० जानेवारी २०२४ रोजी घडली होती. प्रफुल भाऊराव अहिरकर (वय ३७, रा. निलज) असे मृताचे नाव असून शिशुपाल हरीदास भुरे (वय २८, रा. निलज) असे संशयिताचे नाव आहे.Bhandara

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घटनेच्या १५ दिवसांपूर्वी प्रफुलने शिशुपालला शिवीगाळ केली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी शिशुपालने त्याला ठार मारण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी प्रफुल हा नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्याकरीता गावालगतच्या झुडपी जंगलात गेला होता. परंतु, तो घरी परतला नाही. त्याचा शोध घेतला असता तो घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्याला उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पवनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. Bhandara

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्याचा खून झाल्याचा संशय बळावला. आरोपी शिशुपालने मृत प्रफुलला मादक द्रवामध्ये विष दिले. त्यानंतर त्याच्या शेळ्या चोरुन विक्रीसाठी एका खाटकाकडे नेले. पोलिसांनी त्या खाटकाची विचारपूस केली असता आरोपीने शेळ्या विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. तसेच ५ फेब्रुवारीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभिप्रायावरुन प्रफुलवर विषप्रयोग करुन त्याचा ठार केल्याचे समोर आले.

शिशुपालला ताब्यात घेतल्यानंतर शिवीगाळ केल्याने बदला घेण्याच्या उद्देशाने त्याच्यावर विषप्रयोग केल्याचे समोर आले. याप्रकरणी पवनी पोलिसांनी आरोपी शिशुपाल भुरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चहांदे करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button