भंडारा: बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून माजी नगरसेवकाला मारहाण | पुढारी

भंडारा: बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून माजी नगरसेवकाला मारहाण

भंडारा: पुढारी वृत्तसेवा :  तुमसर नगर परिषदेने चर्मकार समाजाच्या जागेवर चर्मकार समाज सेवा संघाच्या नोंदणीकृत पदाधिकाऱ्यांची परवानगी न घेता शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या फंडाचा गैरवापर केला आहे. या फंडातून अनधिकृतपणे बांधकाम केल्याची तक्रार माजी नगरसेवक तथा चर्मकार समाज सेवा संघाचे सचिव श्रीकांत भोंडेकर यांनी केल्याच्या रागातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यात ते जखमी झाले असून तुमसर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुरेश कनोजे (वय ५८), अमृत कनोजे (वय ५६, दोघे रा. संत रविदासनगर, तुमसर) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.

चर्मकार समाज सेवा संघ तुमसर या संस्थेच्या नोंदणीकृत पदाधिकाऱ्यांकडून अथवा संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र  न  घेता नगर परिषदेने समाजाच्या मालकीच्या जागेवर कोट्यवधी  रुपयांचे शासनाच्या फंडाचा वापर करुन अनधिकृतपणे बांधकाम केले. हे चर्मकार समाजाच्या लोकांवर अन्याय आहे. म्हणून प्रस्तावित बांधकाम थांबविण्यात यावे, तसेच झालेले बांधकाम जमीनदोस्त कराण्यात यावे, अशी तक्रार सचिव भोंडेकर यांनी केली. जिल्हाधिकारी यांनी पुढील बांधकामास स्थगिती देवून देयके थांबविले आहे.

दरम्यान, १९ जानेवारीरोजी दुपारच्या सुमारास श्रीकांत भोंडेकर हे हिवराज बिनझाडे यांचे चहाच्या दुकानावर बसले असता अचानक  संशयित आरोपींनी येवून तक्रार केल्याच्या रागातून शिवीगाळ करत बिनझाडे  व  भोंडेकर या दोघांना मारहाण केली. व जिवानिशी मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रारीवरुन तुमसर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा 

Back to top button