भंडारा: खापा जंगल शिवारात विद्युत तारांच्या स्पर्शाने तरुणाचा मृत्यू

File Photo
File Photo

भंडारा: पुढारी वृत्तसेवा: प्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये लावलेल्या विजेच्या जिवंत तारांच्या स्पर्शाने एका २७ वर्षीय तरुणाचा जागीच अंत झाला. ही घटना अड्याळ पोलिस ठाणेअंतर्गत असलेल्या खापा जंगल शिवारात घडली. अमोल शंकर आडे (वय २७, रा. वाकेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

खापा जंगल शिवारात शिकारीसाठी जंगलामध्ये अज्ञात व्यक्तीने विद्युतच्या जिवंत तारा पसरवून ठेवल्या. जंगल शिवारात कामानिमित्त गेलेला अमोल हा त्या जिवंत विद्युत तारांच्या संपर्कात आला. यात त्याला जोरदार शॉक लागून तो भाजला. सकाळी खापा येथील नागरिक जंगलात गेले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. करिष्मा अमोल आडे यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक हरिचंद्र इंगोले करीत आहेत.

हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी शेतशिवारात विद्युत आकोडे किंवा विजेच्या जिवंत तारा पसरविण्यात येतात. याच विद्युत तारांचा स्पर्शाने अमोलचा नाहक बळी गेला. या विद्युत तारा शिकारीसाठी लावण्यात आल्याचेही समोर येत आहे. तरीही वनविभाग गप्प का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news