भंडारा: काकाच्या अस्थि विसर्जनाकरीता गेलेल्या पुतण्याचा बुडून मृत्यू

bhandara
bhandara

भंडारा:पुढारी वृत्तसेवा : काकाच्या अस्थि विसर्जनाकरीता आलेल्या पुतण्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. तर तिघे थोडक्यात बचावले. ही घटना तुमसर तालुक्यातील माडगी नदीघाटावर शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. प्रणिकेत शिवराम पराते (वय २२, रा. सरांडी ता. तिरोडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर संस्कृत सोराते (वय १६), रेतन सोरते (वय १७), सुनील पराते (वय ३५) तिघेही (रा. देवरी, जि. गोंदिया) असे बचावलेल्या नातेवाईकांची नावे आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील प्रणिकेतचे काका नरेंद्र बुधाजी पराते (वय ५०, रा. देवरी, जि. गोंदिया) यांचे आठवडाभरापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमाकरीता पराते कुटुंबीय माडगी येथील वैनगंगा नदीघाटावर आले होते. वैनगंगेच्या पात्रात मोक्षविधी पार पाडताना कुटुंबातील संस्कृत, रेतन, सुनीलसह प्रणिकेत पाण्यात उतरले. परंतु, त्यांचा पाण्याचा अंदाज चुकला व चौघेही पाण्यात बुडाले. प्रसंगावधान राखत कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या बचावाकरिता धावले. त्यात संस्कृत, रेतन, सुनील हे थोडक्यात बचावले. तर प्रणिकेत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

सदर प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी करडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. प्रणिकेत गवसत नसल्याने एनडीआरएफची चमू पाचारण करण्यात आली. घटनास्थळावर स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. करडी पोलिसांच्या मदतीने एनडीआरएफ चमूने तीन तासांनी प्रणिकेतचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
घटनेची नोंद करून करडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. अधिक तपास करडीचे ठाणेदार आर. डी. गायकवाड करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news