भंडारा : वन कर्मचाऱ्यांच्या वाहनावर तस्करांचा हल्ला

भंडारा : वन कर्मचाऱ्यांच्या वाहनावर तस्करांचा हल्ला

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या वाहनावर तस्करांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार टेमनी गावात घडला. हल्ल्यानंतर तस्कर सुसाट वाहनाने मध्य प्रदेशच्या दिशेने पळून गेले. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसले तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. तुमसर तालुक्यात सागवन तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना आता चक्क वनकर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा   तस्करांकडून प्रकार घडला आहे.

अवैध व्यावसायिक, लाकूड तस्कर हे मध्य प्रदेशातून अवैध साहित्याची आयात महाराष्ट्रात करतात. बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी आणि वन विभागाचा तपासणी नाका आहे. तस्करांकडून बावनथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. हा मार्ग पोलीस व वन विभागाच्या निगराणीत नाही. यामुळे अवैध साहित्याची आयात व निर्यात याच धरण मार्गावरुन करण्यात येत आहे.

दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मध्यप्रदेशातील गावातून अवैध साहित्य घेऊन येणाऱ्या चारचाकी वाहनाची माहिती मिळाली होती. यामुळे बपेरा क्षेत्र सहायक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिवारात गस्त वाढविली होती. वन कर्मचारी चारचाकी वाहनाने गस्त करण्यास निघाले. सोंड्याटोला प्रकल्प धरण मार्ग ते सिहोरा गावाना जोडणाऱ्या मार्गावर गस्त देत असताना चारचाकी वाहन पहाटे ३ वाजेच्या सुमारास टेमनी गावाच्या शिवारात दिसले. त्या वाहनाला तपासणीकरीता थांबविण्यात आले. तसेच वाहन ताब्यात घेण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी मार्गावर ट्रॅक्टर आडवे केले. परंतु, वाहन चालकाने थेट वन कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनाला धडक देत मध्य प्रदेश सीमेचे दिशेने पोबारा केला. या घटनेची माहिती सिहोरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news