भंडारा : रानडुक्कराचा शाळेत सात तास धुडगूस; वनविभागाने केले जेरबंद | पुढारी

भंडारा : रानडुक्कराचा शाळेत सात तास धुडगूस; वनविभागाने केले जेरबंद

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : जंगलातून भटकलेले एक रानडूक्कर थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत शिरल्याची घटना तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे घडली. तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर या रानडुक्कराला वनविभागाने जेरबंद केले. रानडुक्कराला पाहण्यासाठी शाळेसमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

चुल्हाड येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याने त्यासाठी मंडप उभारणीचे काम सुरू आहे. दरम्यान गुरुवारी (दि.२) सकाळी ७ वाजता एक वयस्क रानडुक्कर थेट शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरले. सुदैवाने त्यावेळी शाळेचे विद्यार्थी नव्हते. रानडुक्कर शाळेत शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली आणि वन विभागाला या घटनेची माहिती दिली.

तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालय अधिकारी आणि सिहोरा पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रानडुक्कराला पकडण्यासाठी प्रयत्न केले. सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर या रानडूक्कराला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचारी डेव्हीड मेश्राम, काहुलकर, सेलोकर, वासनिक, शेख यांनी केली आहे.

रानडुक्कराला वनविभागाने जेरबंद केल्यानंतर तो जखमी असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याला बपेरा येथील पशुचिकित्सालयात नेऊन उपचार करण्यात आले. त्यानंतर सोंड्याटोला जंगलात सोडून देण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button