भंडारा : माजी आमदाराच्या जीवाला धोका, कोट्यवधींचा धान घोटाळा आणला होता उघडकीस | पुढारी

भंडारा : माजी आमदाराच्या जीवाला धोका, कोट्यवधींचा धान घोटाळा आणला होता उघडकीस

भंडारा : भंडारा जिल्ह्यात सुमारे १०० कोटी रुपयांचा धान घोटाळा उघडकीस आणणारे तत्कालीन भाजपचे आमदार चरण वाघमारे यांच्या जीवाला घोटाळ्यातील आरोपींकडून धोका निर्माण झाला आहे. त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी राज्य शासन आणि जिल्हा पोलिसांना सुरक्षा मागितली आहे. परंतु, अजुनही त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा मिळाली नसल्याचा आरोप माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे.

सन २०१४ मध्ये चरण वाघमारे भाजपचे आमदार असताना त्यांनी भंडारा जिल्ह्यात १०० कोटी रुपयांचा धान घोटाळा उघडकीस आणला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत झाली होती. त्यानंतर सीआयडीने या प्रकरणाचा तपास करुन आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सध्या हे प्रकरण जलदगती न्यायालयात सुरू आहे. आरोपींमध्ये अनेक उच्चभ्रूंचा समावेश आहे. तथापी, त्या कालावधीत आमदार असल्याने सरकारकडून त्यांना सुरक्षा दिली गेली होती. मात्र, आता आमदार नसल्याने सुरक्षा नाही. याशिवाय त्यांना भाजपने निष्काशित केले आहे.

आपण उघडकीस आणलेल्या घोटाळ्यातील आरोपींकडून आपल्या जिवाला धोका असल्याने सुरक्षा मिळावी, अशी मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी राज्य शासन आणि पोलिसांकडे केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतानासुद्धा आपण पोलिस संरक्षणाची मागणी केल्याचे चरण वाघमारे यांनी सांगितले. परंतु, सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चरण वाघमारे यांच्या सुरक्षेबाबत राज्य शासन आणि पोलिस विभाग काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागून आहे.

‘त्या’ माजी आमदाराला सुरक्षा कशी?

महाविकास आघाडीचे सरकार असल्यापासून आपण सुरक्षेची मागणी करीत आहोत. आम्हीही जनतेच्या कामासाठी फिरतो. परंतु, आम्हाला सुरक्षा दिली नाही. तर जिल्ह्यातीलच एका माजी आमदाराला अद्यापही सुरक्षा आहे. त्यांना कोणत्या नियमानुसार सुरक्षा आहे? असा प्रश्नही त्यांनी केला.

Back to top button