प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत वेगळी भूमिका का? : यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर

अमरावती/नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र जाहीर केले आहे. या पत्राद्वारे नवाब मलिक यांना महायुतीत सामावून घेतले जाणार नाही, असे म्हटले आहे. यावरुन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे. नवाब मलिकांबाबत ही भूमिका असेल तर प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत वेगळी भूमिका का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

फडणवीस यांना जर खरोखरच देशद्रोहाचा आरोप असल्यामुळे नवाब मलिक यांना सोबत घ्यायचे नसेल तर त्याच पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांना कसे सोबत घेतले? प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा विकत घेतलेल्या मालमत्तेशी कोणाचा संबंध आहे? प्रफुल्ल पटेल यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा का होत्या? याचीही माहिती फडणवीस यांनी जाहीर करावी. प्रफुल्ल पटेल यांच्या बद्दलही का पत्र दिले नाही, असे प्रश्न काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी आज उपस्थित केले आहे.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याचे विधिमंडळाच्या अधिवेशनात दिसून आले होते. त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. त्यानंतर सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मलिक नकोत, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना दिले. या पार्श्वभूमीवर आ. यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका केली आहे.

सरकारला अधिवेशनात रस नाही

दरम्यान, यावेळी बोलताना अ‍ॅड. ठाकूर पुढे म्हणाल्या की, या सरकारला अधिवेशनात कुठलाही रस नाही. अधिवेशनाच्या कामकाजात सरकारला गांभीर्य आहे असे मला वाटत नाही. परस्परांवर आरोप करण्यात आणि वादविवादाचे राजकारण करण्यात सगळी मंडळी अडकलेली आहे. जनतेने त्यांचे मूलभूत प्रश्न विसरून या निरर्थक वादविवादात अडकावे, अशीच त्यांची इच्छा दिसते आहे. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी काही करावे, अशी या सरकारची बिलकुल इच्छा नाही. सरकार अजिबात संवेदनशील दिसत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news