

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा रविवार (दि. १०) पासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या यात्रेदरम्यान, रविवारी सायंकाळी ५ वाजता मनमाडमधील एकात्मता चौक येथे, तर सोमवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजता नाशिक शहरातील बी. डी. भालेकर मैदानावर अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे. (Mahaprabodhana Yatra )
राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सरकारविरोधात ठाकरे गटाने दंड थोपटले असून, सरकारचे नाकर्तेपण, शेतकऱ्यांवरील अन्याय, बेरोजगारी, वाढती महागाई रोखण्यात आलेले अपयश राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील यात्रेचा समारोप दि. २० मे रोजी बीडमध्ये झाला. खा. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर सुषमा अंधारे, आमदार भास्कर जाधव यांच्या खांद्यावर या महाप्रबोधन यात्रेची धुरा आली. यातूनच पक्षाची आक्रमक भूमिका मांडणारे महत्त्वाचे नेते म्हणून भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांचा उदय झाला. खा. राऊत जेलमध्ये गेल्यानंतर मोजके नेते सोडले, तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात कोणी आक्रमक बोलायला तयार नव्हते. ठाकरे गटासमोर संकट उभे असताना सुषमा अंधारे शिवसेनेची ढाल झाल्या होत्या. (Mahaprabodhana Yatra)
आता खा. राऊत हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यात दुसऱ्या टप्प्यातील महाप्रबोधन यात्रा १० डिसेंबर रोजी नाशकात येत आहे. महाप्रबोधन यात्रे अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात ४० सभांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी मनमाड व नाशिकमध्ये अंधारे यांची जाहीर सभा होत आहे. मनमाड येथील सभेच्या माध्यमातून आ. सुहास कांदे, तर नाशिकमध्ये शिंदे गटात गेलेले खा. हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदींच्या विरोधात अंधारे यांची तोफ धडाडण्याची शक्यता आहे. महाप्रबोधन यात्रेची सुरुवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातून झाली. समारोप वरळी येथील सभेत होणार आहे. अंधारे यांच्या पहिल्या यात्रेला राज्यभरात सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळाला होता. मनमाड व नाशिकमध्ये होणाऱ्या सभेत त्या काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :