Mahua Moitra TMC | तृणमूल खासदार महुआ मोइत्रांच्या हकालपट्टीनंतर विरोधक नाराज | पुढारी

Mahua Moitra TMC | तृणमूल खासदार महुआ मोइत्रांच्या हकालपट्टीनंतर विरोधक नाराज

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा सभेतील कॅश फॉर क्वेरी प्रकरण तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांना भोवले आहे. या प्रकरणात दोषी ठरवत मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. नैतिक आचरण समितीने अहवालातील शिफारशीनंतर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज (दि.८) ही कारवाई केली. यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून काढता पाय घेतला. संसद सभागृह परिसरात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या कारवाईचा निषेध करत, तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या निर्णयावर भाजपवर देखील विरोधी पक्षाच्या खासदारांनी हल्लाबोल केला. (Mahua Moitra TMC)

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा आज (दि. ८) केली.  मोईत्रा यांचे खासदार म्हणून वर्तन अनैतिक आणि अशोभनीय असल्याचा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करत आहे. त्यामुळे त्यांचे खासदार म्हणून राहणे योग्य नाही, अशी टिप्पणी बिर्ला यांनी केली.  (Mahua Moitra TMC)

पुढे महुआ मोइत्रांनी केलेल्या गंभीर गैरवर्तनाबद्दल कठोर शिक्षेची गरज आहे. त्यामुळे समितीने शिफारस केली आहे की खासदार महुआ मोईत्रा यांची सतराव्या लोकसभेच्या सदस्यत्वावरून हकालपट्टी केली जाऊ शकते. महुआ यांच्या अत्यंत आक्षेपार्ह, अनैतिक, गंभीर आणि गुन्हेगारी वर्तनाच्या पार्श्वभूमीवर समितीने केंद्र सरकारला कालबद्ध पद्धतीने सखोल, कायदेशीर, संस्थात्मक चौकशी करण्याची शिफारसही केली आहे.  (Mahua Moitra TMC)

महिला खासदाराची केलेली हकालपट्टी भारत पाहातोय- महुआ

लोकसभेतून हकालपट्टी केल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तेव्हा त्या म्हणाल्या, नैतिक आचरण समितीला हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही. ही भाजपच्या अंताची सुरुवात आहे. जर या मोदी सरकारला वाटत असेल की, माझी हकालपट्टी करून, तुम्ही अदानी प्रकरण थांबवू शकत असाल. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, या कांगारू न्यायालयाने (एथिक्स कमिटी) संपूर्ण भारताला दाखवले आहे की, उद्योगपती अदानी तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. सत्तेच्या जोरावर तुम्ही केलेली घाई आणि गैरवापर हे संपूर्ण भारत पाहत आहे. तुम्ही एका महिला खासदाराचा छळ करून तिची संसदेतून हकालपट्टी केली आहे, असेही त्या म्हणाल्या.

पक्ष महुआंसोबत- प. बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी केल्याबद्दल टीएमसीच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी तुम्हाला सांगत आहे की, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा या परिस्थितीची शिकार ठरल्या आहेत. मी या कारवाईचा तीव्र निषेध करतो. आमचा पक्ष महुआंसोबत आहे, आमचा पक्ष भारत आघाडीसोबत एकत्र लढेल, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

 सूडाच्या भावनेने केलेले कृत्य-अधीर रंजन चौधरी

महुआ मोइत्रा यांची टीएमसी खासदार म्हणून हकालपट्टी केल्याबद्दल, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणतात, “हे निराधार तथ्यांवर आधारित आणि सूडाच्या भावनेने केले आहे”.

त्या आगामी निवडणूकीत प्रचंड बहुमताने विजयी होतील-प्रियांका चतुर्वेदी

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, “ज्यांनी आरोप केले ते दुबईत बसले आहेत. त्यांनी विधान केले आणि त्या आधारे तुम्ही निर्णय घेतला. हे कुठेतरी राष्ट्रीय न्यायाच्या विरोधात गेले आहे. मला आशा आहे. महुआ मोइत्रा आगामी काळात तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवतील आणि प्रचंड बहुमताने विजयी होतील.

…पण संधी दिली नाही-बसपा खासदार दानिश अली

टीएमसीच्या महुआ मोईत्रा यांची लोकसभा सदस्या म्हणून हकालपट्टी केल्याबद्दल, बसपा खासदार दानिश अली म्हणतात, “मी हे (पोस्टर) लावले आहे कारण समितीने आपल्या शिफारशीत माझा उल्लेख केला आहे. कारण मी खासदार महुआ मोइत्रा यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत होतो. पण संधी दिली नाही…” असा आरोप देखील बसपा खासदार दानिश अली यांनी सभागृहावर केला.

हेही वाचा:

Back to top button