अमरावती, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील स्ट्राइक रेट बघितला असता शिंदे यांचा स्ट्राईक रेट डबल आहे. त्यामुळे याचा सरळ सरळ अर्थ काढायचा झाल्यास शिवसेनेची मते एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत. आता तर शिंदे यांच्या सेनेलाच शिवसैनिक खरी शिवसेना मानायला लागले आहेत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीत व्यक्त केले.
आरक्षण बचाव यात्रेनिमित्त प्रकाश आंबेडकर अमरावतीत आहेत. सोमवारी (५ ऑगस्ट ) त्यांनी विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Prakash Ambedkar)
पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा निवडणुकीतील स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लिम या दोन मुद्द्यांमुळे वाढलेला आहे. ही सत्यस्थिती काँग्रेस मधील कुठल्याही नेत्याला त्यांच्या बैठकीत मांडता आली असती. मात्र, काँग्रेसला कणा नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या पक्षातील एकही नेता ही सत्यस्थिती मान्य करायला तयार नाही, असेही ते म्हणाले. (Prakash Ambedkar)
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली. यामधून दोन गट पडले आहे. एक म्हणजे मराठा आणि दुसरा ओबीसींचा गट. राजकीय भांडण सामाजिक भांडणात परिवर्तित करण्याचे अनेकांचे मनसुबे आरक्षण बचाव यात्रेमुळे उद्ध्वस्त झाले. जरांगे यांच्या मागणीनंतर पडलेले दोन गट आणि त्यांचे राजकीय भांडण निवडणुकीपर्यंत कायम राहील. ओबीसी मराठा समाजाला मतदान करणार नाही. तर मराठा समाज ओबीसीला मतदान करणार नाही. आपले आरक्षण जातं आहे, याची जाणीव ओबीसी समाजाला झाली आहे. महाराष्ट्र दंगलीच्या उंबरठ्यावर उभा असताना राजकीय नेते सामाजिक प्रश्नावर भूमिका घेऊ शकत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सध्याचे राजकीय नेतृत्व किती कमकुवत आहे, हे यातून स्पष्ट होते. स्वतःच्या समाजासोबत आहोत की विरोधात आहोत, हे सांगण्याची हिंमत देखील नेत्यांमध्ये नाही, असेही ते म्हणाले. (Prakash Ambedkar)
विधानसभेच्या माध्यमातून ओबीसींच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येणार आहे, असे काहींचे मत आहे. श्रीमंत आणि गरीब मराठ्यांच्या लढाईमध्ये गरीब ओबीसींचा बळी दिला जात आहे. त्यामुळे अशा स्थितीत कुणबी समाज कुठे राहील, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. व्यावहारिक दृष्ट्या कुणबी समाज मराठा-पाटील-देशमुख यांच्याबरोबर आहे आणि आरक्षणासाठी हा समाज ओबीसी आहे असे म्हणतो. त्यामुळे शंका उपस्थित केली जाते. ही शंका कुणबी सोडून उरलेले जे ओबीसी आहेत त्यांनी माझ्याकडे यवतमाळ,पुसदमध्ये व इतर ठिकाणीही बोलून दाखवली असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.