

अमरावती शहरात विदेशी चलनाचे आमिष दाखवून दर्यापूरमधील एका मिनी बँक ऑनलाइन सेंटरच्या संचालकाची 50 हजाराची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकाराबाबत दर्यापूर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये शिवकुमार, राकेश आणि एक महिलेचा देखील समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश गावंडे हे २ जुलै रोजी त्यांच्या मिनी बँक ऑनलाइन सेंटरमध्ये होते. दरम्यान तेथे शिवकुमार नामक तरुणाने त्याच्याजवळ विदेशी चलन असल्याचे उमेश यांना सांगितले. या विदेशी चलानाचे मला भारतीय चलन पाहिजे, असे तो म्हणाला. उमेश गावंडे यांनी विदेशी चलन घेण्याचे मान्य केले. त्यानंतर शिवकुमारने उमेश गावंडे यांची राकेश आणि एका महिलेशी ओळख करून दिली. संशयित आरोपीने उमेश गावंडे यांच्याकडून ५० हजार रुपये घेऊन त्यांना एक बॅग दिली. त्यात विदेशी चलन असल्याचे सांगितले. त्यानंतर उमेश यांनी काही अंतरावर जाऊन बॅग उघडून पाहिले असता, त्यामध्ये कागदाचे गठ्ठे दिसले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे उमेश यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत रविवारी (दि.28) दर्यापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहे.