

EVM preparation Amravati
अमरावती: अमरावती महानगरपालिकेची निवडणूक पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. या तयारीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा (ईव्हीएम) बाबत सर्व नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया निवडणूक अधिकारी तसेच अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान प्रक्रिया सुरक्षित, विश्वासार्ह व सुलभ व्हावी, यासाठी आधुनिक ईव्हीएम प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये १६ बटनची बॅलेट युनिट (बी.यू.) वापरण्यात येणार असून, प्रत्येक मतदान केंद्रावर १ कंट्रोल युनिट (सी.यू.) उपलब्ध राहणार आहे.
मतपत्रिकेवरील उमेदवारांची ओळख अधिक सोपी व्हावी. यासाठी बॅलेट पेपरचे रंग गटनिहाय निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, अ गटासाठी : पांढरा रंग, ब गटासाठी : फिक्कट गुलाबी रंग, क गटासाठी : फिक्कट पिवळा रंग, ड गटासाठी : फिक्कट निळा रंग राहणार आहे.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात एकूण ८०५ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून, सर्व केंद्रांवर आवश्यक त्या ई.व्ही.एम. यंत्रणा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक व्यवस्थेसाठी कंट्रोल युनिट (सी.यू.) एकूण ८०५ तर बॅलेट युनिट (बी.यू.) एकूण ३३२० इतक्या संख्येने सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
मतदान प्रक्रियेपूर्वी ईव्हीएमची प्रथम व द्वितीय स्तरीय तपासणी (एफएलसी) केली जाईल आणि उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोल घेण्यात येणार आहेत तसेच मतदानाच्या दिवशी सुरळीत कामकाजासाठी मतदान अधिकारी व कर्मचार्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला असून, प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक ते सुरक्षाबळ तैनात राहणार आहे. मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
महानगरपालिकेची निवडणूक लोकशाहीचा उत्सव ठरणार असून, ईव्हीएमच्या माध्यमातून पारदर्शक व विश्वासार्ह मतदान प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे.