

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर आल्याने शहरात प्रचाराचा जोर वाढला आहे. या प्रचारात महिला, पुरुष, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांबरोबरच खेळाडूंचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे.
निवडणुकांमुळे फुटबॉल हंगाम बंद असल्याने शहरातील विविध पेठांमधील तालीम संस्था व तरुण मंडळांच्या फुटबॉल संघांतील खेळाडू आपापल्या पक्षाच्या तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. बहुतांश खेळाडूंनी सकाळ-संध्याकाळ अशा दोन वेळच्या नियमित सरावाला तात्पुरता बेक देत सकाळच्या सत्रात सराव पूर्ण करून उर्वरित दिवसभर प्रचाराची आघाडी सांभाळली आहे.
प्रचार फेऱ्या, बैठका, मतदारांशी थेट संवाद, घोषणाबाजी आणि सोशल मीडियावरील प्रचारातही फुटबॉलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. पेठांतील फुटबॉल संघांचा सामाजिक प्रभाव इतर क्षेत्रांप्रमाणेच राजकीय क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर असल्याने उमेदवारांसाठी फुटबॉलपटूंचा पाठिंबा महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे अनेक उमेदवार विविध संघातील फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक यांना सोबत घेऊन प्रचार करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत काही उमेदवार स्वतः खेळाडू असल्याने क्रीडाप्रेमी मतदारांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे.