अमरावती, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. याचा तूर पिकाला मोठा फटका बसत आहे. गेल्या १५ दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे राज्यभरातील तुरीवर 'फायटॉपथोरा ब्लाईट' या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात यंदा खरीप हंगामात जवळपास साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. यंदा पावसाळाही चांगला झाल्याने तुरीच पीक अतिशय चांगलं आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात बदललेल्या वातावरणामुळे तुरीवर फायटॉपथोरा ब्लाईट या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
फायटॉपथोरा ब्लाईट विषाणूजन्य रोगामुळे एकाच आठवड्यात हिरवेगार असलेलं तुरीच पीक सुकलं आहे. त्यातील अपरिपक्व असणाऱ्या तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात लाखो हेक्टरवरील तूर एकाच आठवड्यात सुकलं आहे. त्यामुळे यावर्षी तुरीच पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेल असून, शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.