कोरपना नगर पंचायत निवडणूक काका-पुतण्याच्या उमेदवारीने ठरणार रंगतदार - पुढारी

कोरपना नगर पंचायत निवडणूक काका-पुतण्याच्या उमेदवारीने ठरणार रंगतदार

चंद्रपूर : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या ठिकाणापासून 80 किलोमीटर आणि तेलगंना सीमेला अगदी लागून असलेल्या कोरपना नगरपंचायतीची 21 डिसेंबरला होऊ घातलेली दूसरी निवडणूक आहे. सध्या बावने गटाची सत्ता स्थापित आहे. राजकारणातील मुरब्बी नेता आणि ज्या पक्षात जाईल तिथे आपली कसब लावत सत्ता प्रस्थापित करणे हे त्यांचे राजकीय वैशिष्ट्य. त्यामुळेच अनेक वर्षांपासून त्यांची या ठिकाणी असलेली सत्ता निवडणूकीदरम्यान चर्चेचा विषय ठरली असते. मात्र यावेळी काका-पुतण्याच्या उमेदवारीने कोरपना नगर पंचायतीची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

येथे नगर पंचायतची 17 सदस्यीय संख्या आहे, मात्र ओबीसी आरक्षणामुळे तीन वार्डातील निवडणुकीला स्थगित मिळाली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच 14 जागांसाठी निवडणूक होत आहे. सोमवारी 13 डिसेंबर ला नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. 14 जागा आणि 35 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उद्याच मैदानातील उमेदवारांचे स्थान निश्चित होणार आहे.

कोण मागे घेणार? कोण मैदानात राहणार? कोणकोणाला पाठींबा जाहीर करणार? शिवाय ब-याच राजकारणातील गोष्टी घडणार आहेत. सत्तेच्या समिकरणात असलेल्या विविध पक्षात सुशिक्षित व युवा उमेदवार उभे असल्याने नगरपंचायतीची निवडणुक रंगतदार होणार आहे. राजकारणातील खलबत्ते, चर्चा आणि घडामोडींचे समिकरण आखण्यास गनिमी काव्याने सुरूवात झाली आहे.

शेतकरी संघटना, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना अशी मिळून अभद्र आघाडी स्थापन करण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. त्यामुळेच सत्ताधारी काँग्रेसने सर्वच्या सर्व १४ जागांवर उमेदवार उभे करत एकप्रकारे विरोधकांना कडवे आव्हान उभे केले आहे. ज्या अभद्र आघाडीची जोरदार चर्चा आहे ती होती की नाही? यावरच खरी रंगत ठरणार असल्याचे राजकारणातील जाणकार सांगतात. ज्याचे नाव आघाडीत घेतल्या जाते त्या राष्ट्रवादीने आघाडीची वाट न पाहता काही मोजक्याच ठिकाणी आपले उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करून घेतले आहे. त्यामुळे आघाडीची हवा तर निघणार नाही ?अशीही राजकीय दृष्ट्या शक्यता नाकारता येत नाही. जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार बाशिंग बांधून असल्याने जो तो नगराध्यक्ष पदावर आपला दावा करतो आहे. वेळीच निवडणुकीची घोषणा झाल्याने निवडणूकपूर्व वाटाघाटीला पक्षांना वेळ मिळाला नाही. प्रथमदर्शनी पक्षानी उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेतले आहेत. मात्र उद्या अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

वार्ड क्रमांक 3 मध्ये काका-पुतण्याची लढत

कोरपना येथे ग्राम पंचायत आणि आता नगर पंचायतीवर वर्षानुवर्षे सत्ता ही विजय बावणे घराण्याची राहिली आहे. यावेळी वार्ड क्रमांक 3 मध्ये पहिल्यांदाच काका-पुतण्या एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. काका किशोर बावणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तर पुतण्या नितीन बावणे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या वार्डातील काका पुतण्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीन बावणे यांच्याकडे वडीलांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेचा अनुभव तर काका किशोर बावणे यांना सहकार क्षेत्राचा अनुभव आहे. यांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

3 वार्डातील निवडणूक स्थगित

ओबीसी आरक्षणामूळे कोरपना नगर पंचायत मध्ये तीन वार्डातील निवडणूकीला स्थगिती मिळाली आहे. त्यामध्ये वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2 आणि वार्ड क्रमांक 17 या तीन वॉर्डाचा समावेश आहे. ज्या ओबीसी उमेदवारांनी या ठिकाणी उभे राहण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न चालविले होते त्यांचा हिरमोड झाला आहे. 14 जागांसाठीच निवडणूक होत आहे. नगर पंचायत झाल्यांतर पहिल्यांदाच विजय बावणे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने बहुमताने सत्ता प्रस्थापित केली होती. आता दुसऱ्या पंचवार्षिक निवडणूकीतही केलेल्या विकास कामाच्या आधारे आपला दावा कायम ठेवला आहे. तर विरोधकांनी मात्र सत्ताधाऱ्यांचा हा दावा फेटाळून लावत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र मतदार आता कोणता निर्णय घेणार आणि कोणत्या उमेदवारांना मतदान करणार हे 22 डिसेंबरला स्‍पष्‍ट होणार आहे.

आजी -माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

कोरपना नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आजी – माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे यांनी नगरपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. याकरीता त्यांनी सर्व जबाबदारी विजय बावने यांच्यावर सोपविली आहे. भाजपचे माजी आमदार संजय धोटे यांनी नगर पंचायत निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली आणि आहे. सत्ता परिवर्तन करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न चालविले आहे. या करिता भाजपचे अरविंद डोहे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप यांनीही सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. त्यांनी अविनाश मुसळे यांचेवर जबाबदारी दिली आहे. तर राष्ट्रवादी कडून आबिद अली यांनी जबाबदारी घेत जास्तीत जास्त जागां जिंकण्याचा मानस व्यक्त केला आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button