30 डिसेंबरला इसापुरमधून जाणारे पाणी रोखणार; संघर्ष समितीचा निर्णय | पुढारी

30 डिसेंबरला इसापुरमधून जाणारे पाणी रोखणार; संघर्ष समितीचा निर्णय

हिंगोली, पुढारी ऑनलाईन : जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 30 डिसेंबर रोजी ईसापूर धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी रोखण्याचा निर्णय आज झालेल्या सिंचन संघर्ष समितीत घेण्यात आला. या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट दिसून आली. कयाधू नदीवरील खरबी येथे बंधारा उभा करून त्याद्वारे 9 किलोमीटरचा बोगदा व सात किलोमीटरच्या कॅनॉलद्वारे ईसापूर धरणामध्ये पाणी पोहोचविण्याचा घाट घालण्यात आला आहे. याकरिता साडे तीनशे कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे. असे घडल्यास संपूर्ण कयाधू नदी कोरडी होऊन हिंगोली व कळमनुरी तालुक्याचा वाळवंट होणार आहे.

खरबी प्रकल्प रद्द करण्यात यावा त्याचबरोबर शासनाच्या लेखी असलेले सापळी धरण हे बांधणे शक्य होणार नसल्यामुळे शासनाने अधिकृतपणे सापळी धरण रद्द करावे, जिल्ह्यात मंजूर असलेले सिंचनाचे 140 प्रकल्प तात्काळ मार्गी लावावे, सिंचन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात अभियंता व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत ही पदे तात्काळ भरण्यात यावीत, इसापूर धरणाची उंची वाढविण्यात यावी, पैनगंगा नदी खालील गौळबाजार व इतर बॅरेजेस बांधण्याकरिता तात्काळ मंजुरी व निधी उपलब्ध करून द्यावा या व इतर मागण्यांच्या अनुषंगाने आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर सिंचन संघर्ष समितीची बैठक पार पडली.

या बैठकीला निमंत्रक माजी खासदार शिवाजी माने, खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष बोंढारे यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व जिल्ह्यातील सरपंच व जलतज्ज्ञांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बैठकीमध्ये मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी निमंत्रक शिवाजी माने यांनी इसापूर धरण दरवर्षी क्षमतेनुसार भरत असताना खरबी बंधाऱ्याचा घाट घालून धरणात पाणी वळविण्याची गरजच उरत नाही. त्यामुळे विशिष्ट लोकांच्या मर्जी करिता हिंगोली जिल्ह्याचा वाळवंट कदापि होऊ देता येणार नाही. याकरिता सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सिंचन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे हिंगोली जिल्ह्याचे पाणी पळविले जात आहे. शिवाय जिल्ह्यामध्ये जो अनुशेष दाखविण्यात आला आहे वास्तवात हा अनुशेष 50 हजार हेक्टरपेक्षा अधिक निघू शकतो.

त्या अनुषंगाने शासन दरबारी या विषयाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. सिंचन विभागातील वरिष्ठ अधिकारी काही नेत्यांच्या दबावाखाली मनमानी पद्धतीने आकडेवारी सादर करीत आहे. ज्याचा परिणाम भविष्यामध्ये हिंगोलीच्या सिंचनावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून आजच याबाबतीत हिंगोलीकरांनी पेटून उठणे गरजेचे असल्याचे माने यांनी सांगितले.

या सर्व प्रश्नांबाबत बाबत सिंचन मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ बैठक घेण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात दिलीप चव्हाण यांनी आपण जयंत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदरील प्रश्नावर बैठक आयोजित करण्याचे मागणी करणार असल्याचे जाहीर केले. तर शासनाचे लक्ष वेधण्यात करिता खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर दोघांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाण्याचे ठरले.

या प्रश्नांची तीव्रता लक्षात यावी याकरिता ईसापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी 30 डिसेंबर रोजी थांबविण्यासाठी जनआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले. बैठकीला मान्यवरांसह विठ्ठल चौथमल, राम रतन शिंदे, नंदकुमार खिल्लारी, भैया देशमुख, मधुकर मांजरमकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, कानबाराव गरड, हमीद प्यारेवाले, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, सभापती अंकुश आहेर, अजय सावंत, बाबा नाईक, बाळासाहेब मगर, एडवोकेट शिरसाट, बबलू मंगरूळकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य शेतकरी व जलतज्ञ, पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

Back to top button