Organ Donation  : अवयवदानामुळे मुलासह तिघांना नवजीवन | पुढारी

Organ Donation  : अवयवदानामुळे मुलासह तिघांना नवजीवन

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

अपघातानंतर मेंदू मृत झालेल्या एका २० वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे ( Organ Donation )   १२ वर्षीय मुलासह आणखी दोघांना नवे जीवन मिळाले.

शुभम उमेश बोथले (रा. महाकालपूर, ता. वणी, जि. यवतमाळ) हा यवतमाळ येथे एका खासगी कंपनीत नोकरी करायचा. त्‍याचे वडील शेतकरी असून त्याला आईवडील व दोन भाऊ आहेत.३ डिसेंबर रोजी कामावरून घरी परतत असताना शुभमच्‍या दुचाकीला अपघात झाला, त्‍याच्‍या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला नागपुरातील न्यू ईरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Organ Donation  :  यकृत, किडन्या तसेच नेत्रदानाचा निर्णय

तीन दिवस उपचार केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने ६ डिसेंबर रोजी डॉक्टरांनी त्याला ‘मेंदू मृत’ ( Brain death )   घोषित केले. ‘न्यू ईरा’मधील डॉ. अश्विनी चौधरी यांनी शुभमचे वडील तसेच दोन भावांचे अवयवदानाविषयी ( Organ Donation )  समुपदेशन केले. त्यामुळे त्यांनी त्यासाठी मान्यता दिल्यावर त्याचे यकृत, दोन्ही किडन्या तसेच नेत्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय अवयवदान समन्वय केंद्राच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजीव कोलते, समन्वयक वीणा वाठोरे यांनी या अवयवदानासाठी पुढाकार घेतला. यकृताचे प्रत्यारोपण न्यू ईरामधील एका ५६ वर्षाच्या पुरुषावर करण्यात आले. ही प्रक्रिया डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहील बंसल, डॉ. स्नेहा खाडे यांनी पूर्ण केली.

एक किडनी न्यू ईरामध्ये ६३ वर्षाच्या पुरुष रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. हे प्रत्यारोपण डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. रवी देशमुख, डॉ. शब्बीर राजा, डॉ. साहील बंसल, डॉ. स्नेहा खाडे यांनी केले. दुसरी किडनी किंग्जवे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १२ वर्षीय मुलावर प्रत्यारोपित करण्यात आली. प्रत्यारोपणाची ही प्रक्रिया डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. धनंजय बोकरे, डॉ. वासुदेव रिधोरकर, डॉ. प्रज्ज्वल महात्मे, डॉ. सचिन कुटे यांनी केली. शुभमचा मृतदेह त्याच्या गावाला नेण्याची व्यवस्था न्यू ईरा रुग्णालयातर्फे नि:शुल्क करण्यात आली

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button