नागभीड तालुक्यात बोगस बंगाली डॉक्टरला अटक | पुढारी

नागभीड तालुक्यात बोगस बंगाली डॉक्टरला अटक

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्टरला नागभीड तालुक्यात कानपा या गावी अटक करण्यात आली आहे. बिशू संतोष सरकार (वय ३० ) असेव बोगस डॉक्टरचे नाव आहे. ही कार्यवाही जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पुनर्विलोकन समितीच्या चौकशीवरून करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

ग्रामीण भागातील गावामध्ये अनेक बोगस व्यक्ती परवाना नसतानाही डॉक्टरकीचा व्यवसाय करतात. ग्रामीण जनतेची लूट करतात. कधीकधी तर बोगस डॉक्टरकीमुळे नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बोगस वैद्यकीय व्यावसायिकावर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली आहे.

याच समितीने नागभीड तालुक्यात वैद्यकीय विभागाच्या समितीने पाहणी केली. या दरम्यान तालुक्यातील कानपा येथे कावळे यांच्या घरी बंगालमधील बिशू सरकार हा व्यक्ती कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करताना चौकशीत आढळून आला. समितीने बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात छापा टाकला असता अलिओपॅथी औषधे जप्त करण्यात आली. यावरून तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी यांनी पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रार नोंदविली.

नागभीड पोलिसांनी आरोपी बिशू संतोष सरकार याच्या विरोधात कलम ३३,३३(अ ),३६ महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ सहकलम ४१९,४२० भादंवी नुसार गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे. नागभीड तालुक्यात अनेक गावात बोगस बंगाली डॉक्टरांनी राजरोसपणे दवाखाने थाटली असून यामुळे ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांचा शोध घेवून कार्यवाही करावी अशी मागणी या घटनेनंतर जोर धरत आहे.

हेही वाचा 

Back to top button