गोंदिया: चोरखमारा येथे नाल्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू | पुढारी

गोंदिया: चोरखमारा येथे नाल्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील पती-पत्नीचा गावालगतच्या नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना आज  (दि. १९) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. सरीता मुनेश्वर कुंभरे (वय ३८) व मुनेश्वर श्रीराम कुंभारे (वय ५०, दोघेही रा. चोरखमारा) अशी मृत दाम्पत्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत सरीता ही शेळ्या चारायला गावालगतच्या नाल्याजवळ गेली होती. यावेळी शेळ्या नाल्याकडे जात असल्याचे पाहून ती शेळ्यांना हाकलण्यासाठी नाल्याकडे गेली असता तिचा पाय घसरून ती नाल्यात पडली. पत्नी घरी परत का आली नाही. हे पाहण्यासाठी पती मुनेश्वर तिथे आला. यावेळी त्याला सरीता नाल्यात बुडताना दिसली. दरम्यान, तिला वाचविण्यासाठी मुनेश्वर सुध्दा नाल्यात उतरला. मात्र, त्यालाही पोहता येत नसल्याने दोघांचाही नाल्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेचा अधिक तपास तिरोडा पोलिस करीत आहेत.

कर्जाला कंटाळून जीवन संपविल्याची चर्चा…

मृत मुनेश्वर यांच्यावर कर्ज असल्यामुळे या पती-पत्नींनी कर्जाला कंटाळून आपले जीवन संपविले असावे. अशा चर्चा परिसरात रंगल्या असून मृत दाम्पत्याना दहा वर्षाची प्रणाली नावाची मुलगी असल्याचे कळते. एकीकडे जिल्ह्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडत असताना या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा

Back to top button