Rashmi Barve : काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना धक्का: सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली | पुढारी

Rashmi Barve : काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना धक्का: सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : जात पडताळणीत जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने उमेदवारी बाद झालेल्या काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना सुप्रीम कोर्टाकडूनही आज (दि.१०) दिलासा मिळू शकलेला नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचाराला आज नागपूर जिल्ह्यात येत असताना काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार व बर्वे दाम्पत्याना हा मोठा धक्का मानला जात आहे. Rashmi Barve

रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती. काही दिवसांपूर्वी बर्वे यांना उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्राच्या बाबतीत दिलासा दिला असला तरी निवडणुकीची प्रक्रिया पुढे गेल्याने लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. Rashmi Barve

दरम्यानच्या काळात त्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने आता बर्वे यांची ही याचिका देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याने बर्वे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

रामटेक ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पण रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केले. त्यामुळे त्यांच्या जागेवर त्याचे पती श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे गेल्यावेळी काँग्रेसचे उमेदवार असलेले किशोर गजभिये वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

हेही वाचा 

Back to top button