Rashmi Barve : हे तर षडयंत्रच, निर्णयाविरोधात सर्वोच्च दाद मागू,जिंकू : रश्मी बर्वे | पुढारी

Rashmi Barve : हे तर षडयंत्रच, निर्णयाविरोधात सर्वोच्च दाद मागू,जिंकू : रश्मी बर्वे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विरोधक संपविण्याचे सरकारचे धोरण पुन्हा एकदा उघड झाले. आपल्याला निवडणूक लढण्यापासून रोखण्याचे हे षडयंत्र असून एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव असे नारेबाजी करायची तर दुसरीकडे एका महिलेवर अन्याय करायचा, हे सत्तेचा माज चढलेल्या सरकारचे धोरण असून मी महिला असली तरी अबला नाही, दुर्गेचा अवतार घेत भस्मासुराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. (Rashmi Barve)

ही हुकूमशाही फार काळ चालणार नाही, माझे नेते संघर्षशील सुनील केदार असून मला जितके अडवाल तितक्याच कणखरपणे मी पुढे जाईल, आम्ही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागू आणि न्यायदेवतेवर विश्वास असून निश्चितच आमचा विजय होईल असा दावा रामटेक लोकसभा मतदारसंघात बाद ठरलेल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांनी या निर्णयावर पत्रकारांशी बोलताना केला.

आज दिवसभर घडलेल्या घडामोडीत जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर रात्री निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देखील त्यांचा नामांकन अर्ज पडताळणीत बाद ठरविला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक,जि प उपाध्यक्ष कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे, एडवोकेट शैलेंद्र नारनवरे आदि उपस्थित होते. (Rashmi Barve)

मी जिल्हा परिषद अध्यक्षा असताना हेच जात प्रमाणपत्र चालते मात्र लोकसभेला ते चालत नाही का? असा सवाल बर्वे यांनी उपस्थित करतानाच ज्या विरोधकांनी माझ्या जातीवर संशय घेतला आता त्यांनीच मी कुठल्या जातीची आहे हे स्पष्ट करावे. असे आव्हानही दिले. आपल्या ऐवजी आता आपले पती शामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार असून त्यांच्याही बी फार्म वर विरोधकांनी आक्षेप घेतला यावरून या मतदारसंघात काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘पंजा’राहू नये असा प्रयत्न सत्तारूढ लोकांकडून होत असल्याचे दिसते असाही आरोप त्यांनी केला.

दरम्यान, यापूर्वी मिळालेले जात प्रमाणपत्र जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून चालते तर आज अवैध कसे ठरते,असा सवाल अॅड. नारनवरे यांनी उपस्थित करताना विविध तांत्रिक बाजू लक्षात घेता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात निश्चितच आमच्या बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त केला. राजकीय हस्तक्षेपातून हे प्रकरण पुढे गेल्याचे दिसते, कुठलीही बाजू ऐकून न घेता रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले हा सर्व प्रकार नैसर्गिक न्यायाविरोधात आहे असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button