Rashmi Barve |नागपूर: रश्मी बर्वे यांना दिलासा, मात्र निवडणुकीची संधी हुकली | पुढारी

Rashmi Barve |नागपूर: रश्मी बर्वे यांना दिलासा, मात्र निवडणुकीची संधी हुकली

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांना आज (दि.४) उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मात्र, निवडणूक लढण्याची त्यांची संधी हुकली आहे. जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविल्यामुळे त्यांचा रामटेक लोकसभा निवडणुकीतील अर्ज रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांचे जि.प. सदस्यत्व देखील रद्द झाले आहे. Rashmi Barve

याविरुद्ध रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. गुरुवारी सकाळी उच्च न्यायालयाने रश्मी बर्वे यांना दिलासा देत जातवैधता समितीच्या जात प्रमाणपत्र अवैध निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र, लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे त्यांची लोकसभा निवडणूक लढण्याची संधी हुकली आहे. आता त्यांचे पती श्यामकुमार उर्फ बबलू बर्वे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Rashmi Barve

राजकीयदृष्ट्या रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार विरुद्ध भाजप असा संघर्ष असल्याचे बोलले जाते. आपल्याला जाणीवपूर्वक बाद करण्यात आले. एका महिलेवर भाजपने अन्याय केला, असा आरोप बर्वे यांनी पत्रकार परिषदेत केला. तर काँग्रेसने जात प्रमाणपत्र रद्द होणार हे ठाऊक असूनही त्यांची उमेदवारी दाखल केली. हे काँग्रेसचे षड्यंत्र असल्याचा आरोप शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत, मनीषा कायंदे यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता.

यावरून या मतदारसंघात भाजप-सेना विरुद्ध काँग्रेस संघर्ष पाहायला मिळत आहे.आता निवडणूक लढण्याची संधी हुकलेल्या रश्मी बर्वे बबलू बर्वे यांची राजकीय लढाई जिंकणार का ? ४ जूनरोजी निवडणूक निकालातच स्पष्ट होणार आहे. न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी रश्मी बर्वे प्रकरणी अंतरिम आदेश दिला. न्यायालयाने सर्व प्रतिवादी यांना नोटीस बजावून २४ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button