नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे. जो सत्ता, स्वार्थासाठी कधीही फुटला नाही, कधीकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी असे २ खासदार होते. पण हा पक्ष लढत राहिला. आज हा पक्ष ३०२ पर्यंत पोहोचला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. Devendra Fadnavis
भाजप स्थापना दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (दि.६) महाल गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात व नंतर दक्षिण पश्चिम मतदारसंघात तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात संपर्क साधला. राज्याचे प्रभारी डॉ. दिनेश यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह आमदार,पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीस बोलत होते. Devendra Fadnavis
ते पुढे म्हणाले की, बूथ चलो अभियान' हे वारंवार आम्ही राबवत असतो. आज (दि.६ एप्रिल) स्थापना दिवसाचे औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललो आहोत. नेहमीच 'बूथ' हा प्रमुख धरून आम्ही काम करत असतो. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे सोपे होते. आज महायुतीत तीन पक्ष सोबत आहेत. त्यामुळे मित्र पक्षांचा सन्मान राखणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. राज्यात लोकसभेच्या ३३ जागा आम्ही लढू, असा आम्ही कधीही दावा केला नव्हता. सुरुवातीपासून आमचा प्रयत्न होता की तिघांचाही सन्मान राखून ज्या जागा मिळतील, त्या जागा आपण लढल्या पाहिजेत.
श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी आमची युती श्रीकांत शिंदे यांना निवडून आणेल, असा दावा त्यांनी केला.
कोणीतरी महाविकास आघाडीचे वर्णन अतिशय चांगले केले आहे. महाविकास आघाडी असेल किंवा I.N.D.I. आघाडी असेल. ही आघाडी केवळ इंजिन आहे, यांना एकही डबा नाही, त्यामुळे या इंजिनमध्ये बसायला ही जागा नाही. प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेने चालले आहे. सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगायचे आणि पुन्हा आपापले इंजिन घेऊन वेगळ्या दिशेने जायचं. असे इंजिन काय कामाचे ? असा सवालही फडणवीस यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात की, बारामतीमध्ये एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात छेडले असता जयंत पाटील आजकाल इर्रेलेवेंट झाले आहेत. मला माहित आहे की, ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की, त्यांच्या पक्षात त्यांना कोणीही विचारत नाहीत. त्यामुळे अलीकडच्या काळात ते अशी वक्तव्य करत आहेत.
हेही वाचा