इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील भाजप नेते,माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सागर बंगल्यावर बुधवारी (दि.२०) चर्चेसाठी बोलविल्याची मोठी चर्चा इंदापूर तालुक्यात व बारामती मतदारसंघांमध्ये सध्या सुरू आहे. या चर्चेत फडणवीस हे पाटील यांना इंदापूर विधानसभेच्या संदर्भात कोणता शब्द देतात याकडे त्याच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी सुरु झालेली 'काटे की टक्कर' लक्षात घेता, राज्यातील महायुतीचे जेष्ठ नेते या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देत आहेत. या मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या गेल्या चारही निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे पाटील यांना त्यासाठीच निमंत्रण देण्यात आले आहे. पाटील यांनी बारामती लोकसभेच्या 2004, 2009, 2014, 2019 या चारही निवडणुकांमध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे काम करूनही नंतर झालेल्या इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दिलेला शब्द पवारांकडून पाळला गेला नाही याची खंत त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. सलग चार वेळा इंदापूर विधानसभेला पवारांनी फसविल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली तीव्र नाराजी मुंबई-दिल्ली पर्यंत पोहचलेली आहे.
देशातील सर्वात 'हायव्होल्टेज' लढत बारामतीत लोकसभा मतदार संघात होत असल्याने महायुती व महाविकास आघाडीचे नेते मतदारसंघांमध्ये सूक्ष्म नियोजन करीत आहेत. यामध्ये कोठेही कमी पडणार नाही याची दक्षता देखील घेत आहेत. या लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे वाटत असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याशी पाटील यांच्या होणाऱ्या चर्चेकडे राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले.