पद्म पुरस्काराचे सामाजिकीकरण होणे योग्यच – डॉ. अभय बंग

पद्म पुरस्काराचे सामाजिकीकरण होणे योग्यच – डॉ. अभय बंग

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सध्याचे युग हे स्पर्धेचे असून मनामनात असूया रूजलेली आहे. अशात अजातशत्रू असलेल्या डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्‍यासारख्‍या सामाजिक चळवळीतील व्यक्तीचा सत्कार होणे अभिनंदनीय आहे. वैद्यकीय क्षेत्राची त्यांनी तीन पिढ्यांपासून सेवा केली असून त्‍यांना मिळालेला पद्म पुरस्‍कार हे पुरस्कारांचे सामाजिकीकरण झाल्‍याचे द्योतक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले.

पद्मश्री प्राप्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या सत्‍काराचा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघातर्फे रविवारी अमेय दालनात आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, प्रसिद्ध चित्रकार बसोलीचे चंद्रकांत चन्ने, वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, सरचिटणीस विलास मानेकर यांची उपस्थित होती. प्रकाश एदलाबादकर यांनी मानपत्राचे वाचन केल्‍यानंतर मान्‍यवराच्‍या हस्‍ते डॉ. मेश्राम यांचा शाल, मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्‍यात आला. यावेळी त्‍यांच्‍या पत्‍नी नम्रता मेश्राम यांचा रंजना दाते यांनी सत्‍कार केला.

डॉ. बंग यांनी सामाजिक भान असलेल्या, कलेची जाण असलेल्या या न्युरॉलॉजिस्टला हा पुरस्कार मिळाल्‍याबद्दल आनंद व्‍यक्‍त केला. डॉक्टरी पेशा जेव्हा समाजासोबत चालतो तेव्हा त्याची उंची वाढते, असे ते म्‍हणाले.

सत्काराला उत्तर देताना पद्मश्री पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल डॉ. मेश्राम यांनी आनंद व्‍यक्‍त केला. ज्या लोकांकडून प्रेरणा घेतली त्‍या डॉ. अभय बंग यांच्‍या हस्‍ते सत्‍कार होणे भाग्‍याचा क्षण आहे असे ते म्‍हणाले. लहान खेड्यातील आलेल्‍या माझ्यासारखा व्यक्ती अनेकांच्‍या प्रेरणेमुळे सामाजिक कार्यात ओढला गेला. माझ्या प्रवासात अनेक लोकांचा सिंहाचा वाटा आहे, असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाला ज्‍येष्‍ठ नाटककार महेश एलकुंचवार, अंमळनेर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, डॉ. श्रीराम काणे, डॉ. उदय गुप्ते, डॉ. सुधीर भावे, नितीन सहस्रबुद्धे, विकास लिमये, डॉ. साने, डॉ. सुबोध भावे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन रेणुका देशकर यांनी केले तर विवेक अलोणी यांनी आभार मानले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news