नागपूरच्या युवा संगीतकार व गीतकार श्रेयस पुराणिकला दोन फिल्मफेअर पुरस्कार | पुढारी

नागपूरच्या युवा संगीतकार व गीतकार श्रेयस पुराणिकला दोन फिल्मफेअर पुरस्कार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरचा युवा संगीतकार व गीतकार श्रेयस पुराणिकला दोन प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार प्राप्‍त झाले आहेत. अहमदाबाद येथे झालेल्या फिल्मफेअरच्या शानदार समारंभात श्रेयसला आर.डी. बर्मन अपकमिंग म्युझिक टॅलेंट २०२४ पुरस्कारासह हिंदी चित्रपट ‘ॲनिमल’ मधील ब्लॉकबस्टर ‘सतरंगा’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्‍कारांसाठी श्रेयसचे बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात कौतुक होत आहे.

31 वर्षीय श्रेयसचा जन्म नागपूरचा असून तो प्रशांत पुराणिक आणि शुभा पुराणिक यांचा मुलगा आहे. सोमलवार निकालसमधून त्‍याचे प्राथम‍िक शिक्षण झाले. पुढे तो दिग्गज गायक सुरेश वाडकर यांच्याकडून संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेला. संगीताची लहापणापासून आवड असलेल्‍या श्रेयसने वयाच्या तिस-या वर्षापासूनच गायन सुरू केले.

पत्रपरिषदेत श्रेयस म्हणाला, ‘संगीत ही माझी आवड आहे आणि मला श्रोत्यांना आवडणारे संगीत एक्सप्लोर करण्यासाठी प्रयोग करणे आवडते’. ‘महान दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा खरोखरच मोठा सन्मान आहे असे श्रेयस म्हणाला. श्रेयसने अॅनिमलचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि ‘ॲनिमल’च्या टीमचेही आभार मानले.

श्रेयसचा आतापर्यंतचा बॉलीवूड संगीत प्रवास अतिशय रोमांचक आणि विविधतेने नटलेला राहिला आहे. 2015 च्या ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून करियरला सुरुवात करणा-या श्रेयसने या चित्रपटासाठी ‘गजानना’ आणि ‘अब तोहे जाने ना दूंगी’ या गाण्यांना संगीत दिले होते. याशिवाय, पायल देवसोबत ‘अब तोहे जाने ना दूंगी’ हे गाणेही गायले. पुढे, त्याने भन्साळींसोबत 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ आणि 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या हिंदी चित्रपटांसाठी काम केले. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फोटोकॉपी’, ‘लपाछपी’ आणि 2017च्या ‘फास्टर फेणे’, या मराठी चित्रपटांसाठी त्याने संगीतकार म्हणून काम पहिले. 2019 मध्ये, त्याने ‘मलाल’ या हिंदी चित्रपटातील “नाद खुळा” गाण्यासाठी गायक आणि संगीतकार म्हणून काम केले. याच चित्रपटातील ‘आयला रे’ या गाण्यात त्याने ‘रॅप’ देखील केले. त्याने हिंदी लघुपट ‘बुद्ध’ (अवेकिंग) साठी संगीतकार म्हणूनही काम केले आहे. 2023 मध्ये त्याने ‘ॲनिमल’ या हिंदी चित्रपटातील “सतरंगा” गाण्यासाठी संगीत दिले. हे गाणे अरिजित सिंगने गायले होते. यासोबतच 2019 मध्ये राहुल वैद्यसाठी ‘याद तेरी’, 2022 मध्ये श्रेया घोषाल सोबत ‘उफ’ आणि मध्ये सोनू निगम सोबत ‘शिव शंकरा’ (2019) आणि ‘अवध में लौटे है श्री राम’ (2024) असे अनेक सिंगल्स आणि हिंदी संगीत व्हिडिओ तयार केले आहेत. यावेळी शेफ विष्‍णू मनोहर, प्रशांत पुराणिक, शुभा पुराणिक, ऐश्‍वर्या पुराणिक व सुरेश संगमनेकर उपस्थित होते.

Back to top button