Nagpur IT Hub : नागपूर होतेय ‘आयटी हब’ : वारंगा परिसरात ट्रिपल आयटी उद्घाटन  | पुढारी

Nagpur IT Hub : नागपूर होतेय 'आयटी हब’ : वारंगा परिसरात ट्रिपल आयटी उद्घाटन 

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात आज (दि. २४) नागपुरात बड्या शिक्षणसंस्था एम्स, ट्रीपल आयटी, लॉ युनिव्हर्सिटी कार्यरत आहेत, याचा आनंद आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच नागपूरमध्ये मोठ्या कंपन्या येत आहेत, रोजगार निर्मिती होत आहे आणि नागपूरची आयटी हबच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे  प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकरिता माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तरुणांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असेही ते म्हणाले.

माहिती व जैव तंत्रज्ञान भारताचे भविष्य : गडकरी

ज्या देशाकडे तेलाचा मुबलक साठा आहे तो देश पूर्वी श्रीमंत मानला जायचा. आज तेलाची जागा डेटाने घेतली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राने मोठी क्रांती केली असून यात भारतीय तरुणांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. भारताने माहिती तंत्रज्ञानासह जैव तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही उत्तम प्रगती केली आहे. हे तंत्रज्ञान भारताचे भविष्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.
वारंगा (डोंगरगाव-बुटीबोरी) येथे भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्था (ट्रिपल आयटी) स्थायी इमारतीचे गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ट्रिपल आयटीचे  संचालक ओमप्रकाश काकडे, कुलसचिव कैलाश डाखले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, ‘ज्ञान ही भारताची सर्वांत मोठी शक्ती आहे. आपले विद्यार्थी जगभरात आयटीच्या क्षेत्रात उत्तम काम करीत आहेत. नागपूरला आयटी हब म्हणून विकसित करण्यासाठी आपण पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. मिहानमध्ये एचसीएल, टीसीएस, राफेल यासह आणखी मोठ्या कंपन्या आल्या आहेत. एव्हीएशनच्या क्षेत्रात एमआरओची सुविधाही आपण सुरू केली आहे. त्यामुळे नागपूर केवळ आयटी हब म्हणून नव्हे तर एव्हीएशन हब म्हणूनही विकसित होऊ लागले आहे. गुमगावच्या बाजुला आणखी जागा घेऊन मिहानचा विस्तार करता येईल का, याचा विचार आम्ही करतोय.’ नागपुरात ट्रिपल आयटीच्या नव्या इमारतीचे व परिसराचे आज उद्घाटन होत आहे, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.देशात 20 ट्रिपल आयटी स्थापन करण्याची  चर्चा झाली तेव्हा मी शिक्षण मंत्र्यांना नागपूरचाही समावेश करण्याचा आग्रह केला होता, याचाही गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. मिहानमध्ये येत्या काळात मेट्रो पोहोचणार आहे. आजच मी अंडरपास तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. लवकरच इथे येणारा रस्ता सहा पदरी होईल. राज्य सरकारने मिहानच्या आत चार पदरी काँक्रिटचे रस्ते केल्यास कनेक्टिव्हिटी वाढेल, असेही गडकरी म्हणाले.
देशातील सर्व मोठ्या शैक्षणिक संस्था आज नागपुरात आल्या आहेत. या संस्थांनांचा आपल्या प्रदेशाच्या प्रगतीसाठी उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी प्रदेशाच्या क्षमता ओळखून त्यावर आधारित संशोधन झाले पाहिजे. तरच या गुंतवणुकीचा उपयोग आहे. त्यासाठी ट्रिपल आयटीने नागपूर विद्यापीठ, मिहानमधील कंपन्या, आयआयएम, अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्यासोबत समन्वय, संवाद आणि सहकार्यातून काम करावे, अशी सूचना गडकरी यांनी केली.

Back to top button