भंडारा: सावरी येथे स्लॅब अंगावर कोसळून मजुराचा मृत्यू | पुढारी

भंडारा: सावरी येथे स्लॅब अंगावर कोसळून मजुराचा मृत्यू

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : दोन मजली इमारतीवरील स्लॅब तोडताना अचानक संपूर्ण स्लॅब अंगावर कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२०) सकाळी साडेनऊच्या सुमारास जवाहरनगरजवळील सावरी येथे घडली. शुभम रमेश पेलणे (वय ३०, रा. सावरी, जवाहरनगर) असे मृत मजुराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम याने त्याच्या घरासमोर राहणाऱ्या भिमराव लाडे यांच्या घराच्या वरच्या माळ्यावरील झुला लावलेली सिमेंट विटाची स्लॅब तोडण्याचा ठेका तीन हजार रुपयांमध्ये घेतला होता.

आज सकाळी त्याने स्लॅब तोडण्याचे काम सुरू केले. ड्रिल मशिनच्या मदतीने तीन पक्के कॉलम तोडून झाल्यानंतर चौथा कॉलम तोडत असताना अचानक टॉवरचा स्लॅबचा मोठा थर शुभमच्या अंगावर कोसळला. त्याखाली दबून त्याचा घटनास्थळीच दुर्देवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जवाहरनगरचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, पोलीस पाटील गोविंदा कुरंजेकर, सरपंच गिरीश ठवकर यांच्या समक्ष घटनेचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.

याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा 

Back to top button