Nana Patole : गोंड-गोवारी समाजाच्या उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष: नाना पटोले | पुढारी

Nana Patole : गोंड-गोवारी समाजाच्या उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष: नाना पटोले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गुंडागर्दी व महावसुलीतून थोडा वेळ गोंड-गोवारी समाजासाठीही द्या, नागपूरच्या संविधान चौकात गोंड गोवारी समाजाचे तीन तरूण ११ दिवसांपासून शांततामय मार्गाने उपोषण करीत असताना शासन अथवा प्रशासनातील एकाही व्यक्तीला त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. Nana Patole

आज दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार आदी नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन समर्थन दिले. पक्ष तोडफोडी, गुंडागर्दी व महावसुलीतून थोडा वेळ गोंड-गोवारी समाजासाठीही द्या आणि त्यांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली. Nana Patole

पटोले म्हणाले की, गोंड-गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देण्यात यावेत तसेच वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. गोंड-गोवारी जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राच्या आधारे पदवी आणि इतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बेकायदेशीरपणे रोखून ठेवण्यात आलेल्या शिष्यवृत्ती विनाविलंब देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

सत्ताधारी पक्षाचा एक आमदार दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो, सत्ताधारी पक्षातील तोच आमदार मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करतो. तर एक मंत्री मराठा ओबीसी आरक्षणावरून सरकारच्या निर्णयाविरोधात जाहीर भूमिका घेतो. या सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही. खुर्ची टिकवण्यासाठीच चढाओढ सुरु आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरचेच आहेत. परंतु, ११ दिवसांमध्ये त्यांना एकदाही गोंड गोवारींच्या उपोषणाची साधी दखलही घ्यावी, असे वाटले नाही, हे दुर्दैव आहे. गोंड-गोवारी समाजावरचा अन्याय दूर करण्याच्या त्यांच्या मागणीची सरकारने तात्काळ दखल घेऊन मार्ग काढावा, असे ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button