भंडारा : प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेम विरहातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल | पुढारी

भंडारा : प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेम विरहातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : लाखांदूर तालुक्यातील तई (बू ) येथे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत सापडल्याची घटना आज (दि. १४) उघडकीस आली. प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीने हे जीवन संपवत टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेतील मृत तरुणी ही तई (खुर्द) येथील रहिवासी आहे. १२ जानेवारी रोजी रात्री आईला झोपी गेल्याचे पाहून तिने सोडले. सकाळी शोधाशोध केल्यानंतर आईच्या लक्षात आले की मुलगी घरातून अचानक निघून गेली आहे. त्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची पालांदुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान पालांदुर पोलिसांनी सदर बेपत्ता तरुणीचा शोध घेत तपास सुरू केला. आज (दि. १४) सकाळी त्या बेपत्ता तरुणीचा मृतदेह तई. ( बु )येथील राम मंदिराच्या लगत असलेल्या विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली.
पालांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चाहांदे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, घटनेसंदर्भात अधिक माहिती घेतली असता सदर मृत तरुणीचे एका मुलावर प्रेम होते. या मुलीच्या प्रियकराचा काही दिवसांपूर्वी एका आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूच्या विरहानतंर मुलीने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली असल्याची चर्चा आहे. या घटनेचा पालांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा

Back to top button