Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागेसाठी भाजपकडून प्रदेश महामंत्री व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नगरसेवक छोटू भोयर यांचीच जास्त चर्चा होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तिथे कांचन गडकरी यांनी त्यांचे औक्षण केले. त्या नंतर संविधान चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून समर्थक आणि कार्यकर्त्यांसह बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज दाखल केला.

अर्ज भरण्यासाठी निवडणूक प्रमुख आ. प्रवीण दटके आणि सहनिवडणूक प्रमुख डॉ. राजीव पोतदार खा. डॉ. विकास महात्मे, माजी खा. अजय संचेती, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. समीर मेघे, आ. गिरीश व्यास, महापौर दयाशंकर तिवारी, आ. मोहन मते, माजी आ. सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, चरणसिंग ठाकूर, महानगर पालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगर पालिकांचे नगरसेवक, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थकी लावेन. ही निवडणूक शंभर टक्के जिंकणार आहो, असे सांगितले. पक्षाची मते कधी फुटत नसतात. मंत्री असताना पक्षातीत काम केले. त्याचा फायदा मला मिळेल, असे बावनकुळे म्हणाले.

अभूतपूर्व विजय मिळवू : फडणवीस

चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एक चांगला सहकारी पुन्हा एकदा विधानमंडळात येतो आहे, याचा मनस्वी आनंद झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्री म्हणून चांगले काम केले. एक जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले. गेली दोन वर्षे पक्षाचे महामंत्री म्हणून बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उत्तम काम केले. त्यांना मिळालेली उमेदवारी ही कामाची पावती आहे. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली अभूतपूर्व विजय मिळवू.

विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून केलेली नियुक्तीही आनंद देणारी आहे. महाराष्ट्र भाजपाकरीता अभिमानाची गोष्ट आहे. कारण प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राला राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा मान मिळालेला आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा असे फडणवीस म्हणाले. नितीन गडकरी यांनी छोटू भोयर यांच्यासह काेणत्याही विषयावर बोलण्यास नकार दिला.

हे ही वाचलं का ?

Back to top button