Hingoli incident : रायफलमधून अचानक गोळी सुटल्याने जवानाचा मृत्यू | पुढारी

Hingoli incident : रायफलमधून अचानक गोळी सुटल्याने जवानाचा मृत्यू

आखाडा बाळापूर (हिंगोली); पुढारी वृत्तसेवा

खड्ड्यामध्ये गाडी आदळल्याने रायफलमधून अचानक सुटलेल्या गोळीत जवानाचा मृत्‍यू झाला. कॉन्स्टेबल पप्पाला भानूप्रसाद (वय 35, रा. आंध्र प्रदेश) असे मृत जवानाचे नाव आहे. ते येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत हाेते. भानूप्रसाद हे आपल्या कंपनीतील डॉक्टरांना आणण्यासाठी नांदेडला जात असताना (Hingoli incident) ही दुर्घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये जवान कॉन्स्टेबल पप्पाला भानूप्रसाद (वय 35, रा. आंध्र प्रदेश) हे कर्तव्यावर होते. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ते हैदराबादवरून नांदेडला आलेल्या डॉक्टरांना घेण्यासाठी शासकीय वाहनातून जात होते.

दरम्यान, हिंगोली ते नांदेड या रस्त्याचे काम सुरु असल्याने त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. डोंगरकडापासून तीन किलोमीटरवर गाडी आली असता, रस्त्यावरील एका खड्डयात त्यांची गाडी आदळली. आणि त्यावेळी भानुप्रसाद यांच्या रायफलमधून अचानक गोळी सुटली. ती गोळी थेट भानुप्रसाद यांच्या छातीत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. (Hingoli incident) त्यांना उपचारासाठी तात्काळ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्टरांनी सांगितलं.

पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड, ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती देण्यासाठी त्यांनी सशस्त्र सीमा बलाचे कमांडंट तिवारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचलं का? 

Back to top button