बारामतीच्या सुपुत्राची विक्रमाला गवसणी; पित्‍या प्रमाणेच मिळवला 'आयर्नमॅन' किताब | पुढारी

बारामतीच्या सुपुत्राची विक्रमाला गवसणी; पित्‍या प्रमाणेच मिळवला 'आयर्नमॅन' किताब

बारामती ; पुढारी वृत्तसेवा

बारामतीतील अभिषेक सतीश ननवरे या युवकाने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅनची स्पर्धा पूर्ण करत नवीन विक्रमाची नोंद केली. ग्रामीण भागातील सर्वाधिक कमी वयाचा आयर्नमॅन होण्याचा मान त्याने मिळविला. त्याचे वडील सतीश ननवरे यांनी यापूर्वी या खडतर स्पर्धेत भाग घेत आयर्नमॅनचा किताब पटकावला होता.

अभिषेक याने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत “आयर्नमॅन ” हा मानाचा किताब मिळविला आहे. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ हा मंत्र सर्वदूर पोहचविण्याच्या उद्देशाने तीनदा आयर्नमॅन झालेले सतीश ननवरे हे अभिषेकचे वडील आहेत. आपल्या पित्याकडून प्रेरणा घेत त्यांचेच मार्गदर्शन तसेच माझी आई, सर्व शुभचिंतक, बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सर्व सदस्य, नियमित व्यायाम करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांचे प्रेम आणि शुभेच्छांमुळे ही किमया केल्याचे अभिषेक याने सांगितले.

दक्षिण आफ्रिकेतील गबेरा येथे ही स्पर्धा पार पडली. ट्रायथॉलॉन या प्रकारच्या या स्पर्धेत ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग, ४२.२ किमी धावणे हे तिन्ही प्रकार १६ तासांच्या आत पूर्ण करावे लागतात. जगभरातून हजारो क्रीडा स्पर्धक या खडतर स्पर्धेसाठी सराव करीत असतात. जगातील सर्वात अवघड आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते.

हेही वाचलं का?

Back to top button