Amravati News : इर्विन चौकात युवकाचा चाकूने भोसकून खून, दोघांना अटक | पुढारी

Amravati News : इर्विन चौकात युवकाचा चाकूने भोसकून खून, दोघांना अटक

अमरावती: पुढारी वृत्तसेवा : शहरातील इर्विन चौक येथील कँटीनजवळ एका युवकाची धारदार चाकूने भोसकून गुरुवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली. अजय कंगाले असे त्या मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी हमालपुरा निवासी उज्वल चव्हाण व आकाश सुरोसे या दोघांना अटक केली आहे. तर अन्य फरार आरोपी नवनीत संतोष पवार (हमालपुरा) व आकाश हरले (गाडगे नगर) यांचा शोध सुरु आहे. Amravati News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद आबरावजी इंगोले (वय 40, रा.केवळ कॉलनी) हा गुरुवारी रात्री त्याच्या मित्रांसोबत दारू पिण्यासाठी हमालपुरा येथील बार येथे बसला होता. दरम्यान आरोपी नवनीत पवार हा तेथे आला व काही कारण नसताना अरविंदला शिवीगाळ करू लागला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावर पांघरून घालण्यासाठी हॉटेलच्या वेटरने त्यांना बाहेर काढून दिले. त्यामुळे अरविंद व त्याचा मित्र योगेश चोरे या दोघांनी तेथून निघून दुसऱ्या बार मध्ये जाऊन दारू घेतली. दारू पिणे झाल्यावर योगेश चोरे तिथून निघून गेला, आणि अरविंद हा सचिन सदावर्ते व अजय कंगाले सोबत इर्विन चौकात आला. Amravati News

इर्विन चौक येथील चहा कॅन्टीनजवळ ते आपसात चर्चा करीत होते. तेवढ्यात नवनीत पवार, आकाश हरले, आकाश सुरोसे, उज्वल चव्हाण हे चौघेही तेथे पोहचले व पुन्हा वाद करू लागले. दरम्यान, आरोपी आकाश हरले याने अजय कंगालेवर लोखंडी रॉडने हल्ला केला. बचावासाठी धावलेल्या अरविंद इंगोले यास रॉडने मारून आरोपी उज्वल चव्हाण व आकाश सुरोसे या दोघांनी अजय कंगाले याला पकडून ठेवले. व आरोपी नववीत संतोष पवार याने त्याच्याकडील चाकू अजय कंगाले याच्या पोटात भोकसला. आणि आरोपी पळून गेले. त्यानंतर अरविंद इंगोले व सचिन जनार्दन सदावर्ते यांनी जखमी अजय कंगाले याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारपैंकी दोन आरोपींना अटक केली आहे. तर अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचे सांगितले.

हेही वाचा 

Back to top button