अमरावती : कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचा अपघात, ३ ठार तर ४ जण गंभीर | पुढारी

अमरावती : कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचा अपघात, ३ ठार तर ४ जण गंभीर

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या समारंभानिमित्त ऑटोरिक्षाने जात असतांना मिक्सर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत 7 जणांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऑटोरिक्षामधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास वलगाव ठाण्याच्या हद्दीतील नांदुरा येथील पुलावर ही घटना घडली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूजा सहदेव वाकोडे (16), प्रज्ञा सहदेव वाकोडे (19), पद्माकर देवीदास दांडगे (50) तिघेही रा. चिंचोळी काळे, अशी मृतांची नावे आहेत तर सहदेव वाकोडे (52), फुलवंता वाकोडे (49), करुणा वाकोडे (17) व रंजीता गौतम दांडगे (40) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, वाकोडे व दांडगे कुटुंबातील 7 सदस्य काल बुधवारी 27 डिसेंबरला रात्री ऑटो रिक्षाने अमरावती शहरात एका लग्नाच्या स्वागत समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. मार्गात नांदुरा येथील पेढी नदीच्या पुलाजवळ एका मिक्सर ट्रकने त्यांच्या ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोमधील सर्व गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. अन्य 4 जखमींवर उपचार सुरू आहेत.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी

चिंचोली काळे येथील वाकोडे कुटुंबीय आपल्या घरच्याच ऑटो क्रमांक एमएच 27 पी 3410 ने पोटे कॉलेजसमोरील लुंगे लॉन येथे लग्न समारंभाला जाण्यासाठी चिंचोली येथून निघाले होते. दरम्यान अमरावती शहराच्या दिशेने येत असतांना वाकोडे कुटुंबियांच्या या ऑटोला नांदुरा बु. येथील पेढी नदीच्या पुलाच्या कॉर्नर वर सिमेंट मिश्चर ट्रक क्र.एमएच 04 जेव्ही 2107 ने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, ऑटो मध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांपैकी पूजा वाकोडे (17), प्रज्ञा वाकोडे (16) , पद्माकर दांडगे (60) हे तिघे घटनास्थळीच मृत झाले. तर सहदेव वाकोडे (52), करुणा वाकोडे ( 19), रंजिता दांडगे (40), फुलवंता वाकोडे (49) हे गंभीर जखमी झाले. अपघातादरम्यान ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. गंभीर जखमी असलेल्या सहदेव वाकोडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. अपघातानंतर मार्गावरील वाहतुक विस्कळीत होवून बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती. पोलिसांनी मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.

रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

या भीषण अपघातानंतर तत्काळ सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते. यावेळी डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिघांना मृत घोषीत केले. तर उर्वरित चौघांवर उपचार सुरु केले होते. यादरम्यान नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला होता. मृतकाच्या आईला सांभाळणे देखील कठीण झाले होते. मला तिला एकदा पाहू द्या, असा हट्ट नातेवाईक महिलेेने केला होता. त्या आईचा आकांत पाहून अनेकांना गहिवरुन आले होते.

Back to top button