भंडारा: भागवत सप्ताहात महिलांचे दागिने लंपास; ३ अज्ञात महिलांविरोधात गुन्हे | पुढारी

भंडारा: भागवत सप्ताहात महिलांचे दागिने लंपास; ३ अज्ञात महिलांविरोधात गुन्हे

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : शहरातील शुक्रवारी वॉर्ड परिसरातील हनुमान मंदिरात भागवत सप्ताहात सुरू आहे. यावेळी तीन महिलांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी तीन अज्ञात महिलांविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार तुमाने करीत आहेत.

सोमवारी संध्याकाळच्या सुमारास भागवत सप्ताहानंतर प्रसाद घेत असताना तीन अज्ञात महिलांनी ज्योती बांगळकर रा. राजेंद्र वॉर्ड, भंडारा यांच्या गळ्यातील १६ गॅ्रम वजनाचा सोन्याचा गोफ, पार्वता बांगळकर (रा. शुक्रवार वॉर्ड, भंडारा) यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ आणि सरस्वती भिवगडे (रा. महात्मा गांधी वॉर्ड, भंडारा) यांच्या गळ्यातील २ तोड्याची सोन्याची मोहनमाळ असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

नागरिकांनी तीन संशयितांना पकडले

दरम्यान, भागवत सप्ताह आटोपल्यानंतर संशयितरित्या वावरणाऱ्या ३ महिलांना नागरिकांनी शहरातील लोकवाणी चौकात पकडले. त्यांना चोरीबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तत्काळ भंडारा पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तीनही महिलांना ठाण्यात नेले. परंतु, त्यांच्या झडतीत काहीही सापडले नसल्याने त्यांना सोडण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, भागवत सप्ताहासह कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात भाविक भक्तांची मोठी गर्दी असते. गर्दी पाहून चोरटे दागिने लंपास करीत असतात. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर कार्यक्रमस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सक्ती प्रशासनाने करावी. तसेच शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ दुरुस्त करावे. जेणेकरुन चोरांना जेरबंद करणे सोयीचे होईल, अशी मागणी माजी नगरसेवक बंटी मिश्रा यांनी केली आहे.

हेही वाचा

 

Back to top button