

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील महिला मजुरांना घेऊन बाहेरगावी शेतीच्या कामासाठी निघालेली टाटा सुमो उलटून अपघात झाल्याची घटना आज (दि. १४) सकाळी घडली. मुंढरीजवळ झालेल्या या अपघातातील वाहनात तब्बल २१ मजूर होत्या. त्यांच्यावर करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले असून, गंभीर असलेल्या सहा जणींना भंडारा येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात रस्त्यात आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
देव्हाडा येथील सुरेश गोविंदा उके यांच्या मालकीची टाटा सुमोमधून (क्रमांक एमएच ३१/सीआर०४१४) आज, गुरुवारी जांभोरा येथील महिला मजुरीच्या कामासाठी तोंडरी या गावात शेतीच्या कामासाठी जात होत्या. महिला मजुरांना सुमोमध्ये बसवून चालक जितेंद्र लांजेवार प्रवासाला निघाला. दरम्यान, मुंढरी बुज. येथील मुख्य रस्त्यात अचानक समोर आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वेगातील वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सुमो उलटली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी, काही महिलांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे.
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती दिली. त्यानंतर खासगी व आरोग्य विभागाच्या वाहनांतून जखमींना आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यात पं. स. सदस्य प्रीती शेंडे, भूपेंद्र पवनकर यांच्यासह नागरिकांनी सहकार्य केले.
या अपघातात गंभीर जखमी झालेले चालक जितेंद्र लांजेवार (वय ३०, रा. हेट्टी), गिरीश मारबदे (वय ४०, रा. लेंडेझरी), शोभा भोजराम गोबाडे (वय ३६, रा. जांभोरा), रेखा सुखदेव वाघाडे (वय ४६), रीता गणेश समरीत (वय २६), उज्वला सुनील तुमसरे (वय ३०) यांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
उर्वरित काही किरकोळ जखमींवर करडी येथील आरोग्य केंद्रात उपचार करून घरी पाठविण्यात आले. यामध्ये अश्विनी रमेश कळपते, रायवंता रमेश नेवारे, सुशिला भिमराव वाघाडे, दिव्या दिलीप वलके, शारदा आत्माराम गोबाडे, उर्मिला किशोर माटूरकर, इंदू राधेश्याम माटूरकर, दयावती बाबूराव मेश्राम, अनुसया सदाशिव तुमसरे, शांताबाई कवळू राऊत, मिरा देवदास खंडाते, नेहा अतुल तलांजे, सरिता चंद्रशेखर कंगाले, बोकुळा भोजराम गोबाडे, जयवंता सदाशिव गोबाडे, यमू अतुल तलांजे सर्व रा. जांभोरा यांचा समावेश आहे. या घटनेची करडी पोलिसांनी नोंद केली असून, तपास सुरू आहे.