बुलडाणा : निलंबनाच्या धास्तीने खामगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या | पुढारी

बुलडाणा : निलंबनाच्या धास्तीने खामगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा

संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई होण्याच्या धास्तीने खामगाव (जि. बुलडाणा) आगारातील सहाय्यक मेकॅनिकने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. विशाल प्रकाश अंबलकार (वय 29) असे कर्मचा-याचे नाव आहे.

विशाल अंबलकार हे सात वर्षापासून एसटी महामंडळाच्या सेवेत होते. 27 ऑक्टोबर सुरू असलेल्या संपातील कर्मचा-यांवर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. आपल्याला निलंबित केले तर कुटुंबाचे पालनपोषण कसे होईल? या चिंतेत विशाल अंबलकार हे होते. कुटुंबियांनी त्यांना समजावले सुद्धा होते. परंतू निलंबनाच्या धास्तीने विशालने 16 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजता खामगावातील राहत्या घरी विष प्राशन केले अशी माहिती त्यांचे वडील प्रकाश अंबलकार यांनी दिली.

विशालला उपचारासाठी अकोला येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज (गुरूवार) पहाटे विशाल अंबलकार यांचा मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एसटी कर्मचा-यांतही या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पहा व्हिडिओ : मुंबईत मराठी आवाज बाळासाहेबांनी बुलंद केला | बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी विशेष |balasaheb Thackeray

Back to top button