शरद पवार म्हणाले अनिल देशमुखांच्या त्रासाचा प्रत्येक मिनीट वसूल केला जाईल | पुढारी

शरद पवार म्हणाले अनिल देशमुखांच्या त्रासाचा प्रत्येक मिनीट वसूल केला जाईल

नागपूर : पुढारी ऑनलाईन

नागपूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आठवण काढली. यावेळी पवार हे देशमुख यांच्या विषयी भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. देशमुख यांच्या बद्दल शरद पवार म्हणाले, अनिल देशमुख यांनी त्यांच्या बाबत जे घडलं ते मला सांगितलं होतं. त्यामुळे मला वस्तुस्थिती माहित आहे. देशमुख यांना जो त्रास दिला जात आहे. त्या त्रासाचा प्रत्येक मिनिट वसूल केला जाईल, असा इशाराच पवार यांनी यावेळी दिला.

शरद पवार यांनी यावेळी केंद्रीय संस्थांकडून पक्षातील लोकांवर केल्या जाणाऱ्या कारवाईवर टीका केली. अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, संजय राऊत, एकनाथ खडसे तसेच अजित पवार आणि त्यांच्या बहिणीवर केलेल्या कारवाईचा समाचार यावेळी पवार यांनी घेतला.

यावेळी पवार भावूक होऊन म्हणाले, असे पहिल्यांदाच होत आहे की मी नागपूरला आलो आहे आणि माझ्या सोबत अनिल देशमुख नाहीत. पक्षाच्या स्थापनेनंतर जेव्हा जेव्हा मी नागपूर आलो आहे तेव्हा देशमुख यांनी स्वागत व आदारातिथ्य केलं आहे. देशमुख यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यांच्या बाबत जे घडलं आहे ते त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. त्यांच्यावर ज्यांनी आरोप केला आहे. ते फरार आहेत व अनिल देशमुख यांना कोठडीत ठेवण्यात आलं आहे. या जिल्ह्यात देशमुख यांनी राष्ट्रवादी वाढवली आहे, असे ही पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले, काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही आणि ते लोक केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. सत्ता गेल्यावर माणसे अस्वस्थ होतात. पण, अस्वस्थता इतक्या टोकाला जाऊ नये, असा टोला पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शरद पवार हे चार दिवसांच्या नागपूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत केंद्र सरकार व राज्यातील विरोधी पक्षावर खडसून टीका केली. अनिल देशमुख यांना जो त्रास दिला जातोय तो सर्व त्रास वसूल केला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

विरोधी पक्ष वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून आरोप करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. अनिल देशमुख यांचा दोष नसताना त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना अटक झाली आणि आता आरोप करणारे परमवीर सिंग आहेत कुठे? असा सवालही पवारांनी केला. तसेच या सर्व प्रकरणातून अनिल देशमुख लवकरच सुखरुप परततील आणि लवकरच ते पक्षातील कामात सक्रीय होतील, असे ही पवार यांनी सांगितले.

Back to top button