शरद पवार म्हणाले केंद्र सरकारकडून राज्य सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न - पुढारी

शरद पवार म्हणाले केंद्र सरकारकडून राज्य सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आताचे केंद्र सरकार हे एखाद्या राज्यात सत्ता मिळाली नाही तर सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यातील सरकार अस्थिर करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला येत्या २८ नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी अशा प्रकारचे ट्विट केल्यामुळे भाजपाकडे संशयाने पाहण्याचा दृष्टिकोन अधिक बळावला आहे.

केंद्रातील भाजपाचे सरकार विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. त्यासाठी त्या राज्यामध्ये दंगली व हिंसाचारचे प्रकार सुरू आहेत. या पाठोपाठ महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी केंद्राकडून मागील दोन वर्षांमध्ये अनेकदा प्रयत्न झाले आहेत. त्रिपुरा दंगलीचे निमित्त करून अमरावती, नांदेड आणि इतर जिल्ह्यांमध्ये दंगली झाल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार उभे करण्यात आपल्याला यश मिळाले, अशी भावना व्यक्त करत आगामी सर्व निवडणुकांमध्ये तीन पक्षांची युती असेल, असे संकेत पवार यांनी या माध्यमातून दिले असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button